Ranjangaon Father Son Killed  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime | रांजणगावात थरार! चाकूने भोसकून बाप-लेकाची निर्घृण हत्या

जुन्या भांडणातून रक्तरंजित थरार ; दोन जण जखमी, पाचही आरोपी तासाभरात जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

Ranjangaon Father Son Killed

वाळूज महानगर : जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दुहेरी हत्याकांडात झाल्याची धक्कादायक घटना रांजणगाव शे.पू. येथील कृष्णनगरात सोमवारी (दि. १९) मध्यरात्रीनंतर घडली. या घटनेत चाकूने भोसकल्याने बाबासाहेब रामदास किर्तीकर (४३) आणि त्यांचा मुलगा निहाल बाबासाहेब किर्तीकर (१९, दोघे रा. कृष्णनगर, रांजणगाव) यांचा मृत्यू झाला. तर साहिल आणि कुणाल किर्तीकर हे दोघे भाऊ जखमी झाले. घटनेनंतर पसार झालेल्या पाचही संशयित आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अवघ्या तासाभरात ताब्यात घेतले.

जुन्या वादातून हाणामारीला सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास साहिल किर्तीकर हा गल्लीतील दुर्गामाता मंडळाकडे जात होता. त्यावेळी राजेंद्र गयचंद आणि त्याचा मुलगा नागेश गयचंद यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून साहिलकडे रागाने पाहिले. त्यानंतर साहिल घरी परतत असताना राजेंद्र आणि नागेश यांनी त्याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. नागेशने हातातील लोखंडी कड्याने साहिलच्या डोक्यावर प्रहार करून त्याला जखमी केले. साहिलच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून त्याचे वडील बाबासाहेब, मोठा भाऊ कुणाल आणि निहाल घटनास्थळी धावून आले. त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी नागेशच्या आईने घरातून चाकू आणून तो नागेशच्या हातात दिला. नागेशने जीवे मारण्याच्या उद्देशाने निहाल आणि बाबासाहेब यांच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झाल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

कुणाललाही लाकडी दांड्याने मारहाण

बाबासाहेब आणि निहाल यांच्यावर चाकूने हल्ला केल्यानंतर राजेंद्र, नागेशची आई शानो, भाऊ मयूर आणि बहीण मानसी यांनी कुणाल किर्तीकर यालाही लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. तसेच, ‘आमच्या नादी लागल्यास जीवे मारून टाकू,’ अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर नातेवाइकांनी सर्व जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी बाबासाहेब किर्तीकर आणि निहाल किर्तीकर यांना तपासून मयत घोषित केले. या घटनेमुळे कृष्णनगर परिसरात खळबळ उडाली.

गुन्हा दाखल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे तसेच हाताच्या ठशांचे नमुने गोळा केले. जखमी साहिल किर्तीकर याच्या तक्रारीवरून राजेंद्र गयचंद( ५४), नागेश गयचंद (१९),

मयूर गयचंद (२०), शानो गयचंद (५२)आणि मानसी गयचंद ( २१ सर्व रा. हरियाणा ह. मु. कृष्णनगर, रांजणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तासाभरात पाचही आरोपी ताब्यात

दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी शहरात पसार झाल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय जगताप, शेख सलीम तसेच पोलिस अंमलदार योगेश शेळके, समाधान पाटील, किशोर साबळे, नितीन इनामे, सूरज अग्रवाल आदींच्या पथकाने वेगाने तपासचक्रे फिरवली. पोलिसांनी अवघ्या तासाभरात पाचही आरोपींना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT