Chhatrapati Sambhajinagar rain shortage AI Image
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील ८०० गावं डेंजर झोनमध्ये

४९ दिवसांपासून पाऊस गायब, २६ कोटींचा टंचाई कृतिआराखडा तयार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचे खंड अधिकप्रमाणात वाढले आहेत. २२ सप्टेंबरपर्यंतच्या नोंदीनुसार, काही मंडळात ४५ ते ५१ दिवसांपर्यंत पावसाने ओढ दिली आहे. यात ८४ पैकी ४० मंडळांमध्ये म्हणजेच सुमारे ८०० हून अधिक गावांमध्ये सप्टेंबरच्या सरासरीनुसार ६६ टक्क्यांपर्यंत पावसाची तूट असल्याने डेंजर झोनमध्ये आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने पाणी, चारा टंचाई निवारणासाठी २६ कोटींचा आराखडा तयार केला आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या प्रारंभी जून, जुलैमध्ये पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. परंतु, आऑगस्टचे ४ दिवस वगळल्यास तब्बल २६ दिवस पावसाचा खंड राहिला. त्यामुळे खरीपाचे पिक चिंताजनक स्थितीत आले. हा खंडकाळ ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबरमध्येही कायम राहिल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल ४० मंडळांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा खंडकाळ वाढला आहे.

यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ९, पैठणमध्ये १२ गंगापूर ९, वैजापूर ८ आणि कन्नड, सिल्लोड प्रत्येकी एक असे एकूण ४० मंडळातील तब्बल ८०० हून अधिक गावे डेंजर झोनमध्ये आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि इतर टंचाई निवारण उपाययोजनांसाठी २९ कोटींचा कृती आराखडा तयार केला असून विभागीय आयुक्तालयाला सादर केला आहे.

जिल्ह्यात चौका मंडळात ४१ दिवसांपासून पाऊस गायब आहे. तर पंढरपूर मंडळात ४१, पैठणच्या नांदर, बीडकीन आणि विहामांडवा मंडळांमध्ये २ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान तब्बल ४२ दिवसांचा खंड आहे. वैजापूरच्या लासूर मंडळात तब्बल ५१ दिवसांपासून पाऊस गायब आहे. तसेच गंगापूरच्या तुर्काबाद मंडळात ४ ऑगस्ट ते २० सप्टेंबर असा ४८ दिवसांचा खंड आहे.

ऊस वगळता ७३७०६९.९ हेक्टर क्षेत्रात पेरणी

जिल्ह्यात ऊस वगळता ७३७०६९.९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. म्हणजेच एकूण क्षेत्राच्या ९३ टक्के पेरणी झाली असून त्यात कापूस २८३१३९ हेक्टर क्षेत्रात परंतु, ऐन फुल लागण्याच्या वेळेतच आऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे उत्पादकतेत ४० ते ५० टक्क्यांची घट होण्याचे संकेत दर्शविले आहे.

मक्याची २१२०६१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. परंतु, ऐन कणसे लागण्याच्या आवस्थेतच पावसाने दडी मारल्याने उत्पादकता ५० टक्क्यांने घट होणार असल्याचे संकेत आहे. तुर ६२१४५ हेक्टर पेरणी झाली आहे. परंतु, पावसाने ओढ दिल्याने काही प्रमाणात घट पेक्षीत आहे. सोयाबीन ४५७४७ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. परंतु, त्याच्या उत्पादकतेत तब्बल ६० टक्के घट होणार असल्याचे संकेत कृषी विभागाचे आहे. मुग, उडीद आणि बाजरीचीही तीच स्थिती आहे. यात देखील सुमारे ३० ते ६० टक्क्यांपर्यंत घट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT