

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठबळ देणाऱ्या आंदोलक आणि सहकाऱ्यांवर ईडी, सीबीआयकडून चौकशांचा ससेमिरा लावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार आमच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी, अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही. चौकशी होत असेल तर आम्ही सामोरे जाऊ आणि तुरुंगात जायलाही तयार आहोत; पण समाजासाठी कोणासमोरही झुकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात मंगळवारी (दि. २२) माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी सरकार आणि विशेषतः उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आंदोलनात आर्थिक वा इतर मदत करणाऱ्या मराठा बांधवांना जाणूनबुजून टार्गेट केले जात असून, अगदी सामान्य व्यावसायिकांनाही वेठीस धरले जात आहे. मराठ्यांनी दिलेल्या सत्तेच्या जोरावर आज आंदोलकांनाच संपवण्याचे डाव आखले जात आहेत.
कॅबिनेटच्या बैठकींमध्ये विकासाऐवजी आंदोलनाला कसे रोखायचे, याच्याच गुप्त मसलती चालतात, असाही आरोप त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला. सत्तेत बसलेले ३ टक्के राजकीय मराठे हे ९७ टक्के गरीब मराठ्यांच्या हक्कांवर गदा आणत आहेत. २०२९ च्या निवडणुकीत गरीब मराठा समाज मतपेटीतून या अन्यायाचा वचपा काढेल, असा इशाराही त्यांनी दिला.
कुणबी नोंदींच्या शोधासाठी विशेष मोहीम
सरकारी अधिकाऱ्यांनी कुणबी नोंदी शोधताना अनेक ठिकाणी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप करत जरांगे यांनी स्वतंत्र शोधमोहिमेची घोषणा केली. कन्नड तालुक्यात फेरतपासणीत १०० हून अधिक नोंदी नव्याने मिळाल्याचे सांगत, संपूर्ण मराठवाड्यातील तालुक्यांसाठी ६६ ते ७७ मोडी लिपी अभ्यासकांची फौज मैदानात उतरवली जाईल, असे ते म्हणाले.
यासाठी २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान मोडी, फारशी आणि उर्दू लिपी जाणणाऱ्या अभ्यासकांची गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये नावनोंदणी होणार आहे. या वाचकांना जुने रेकॉर्ड तपासण्याचे विशेष अधिकार असतील.
सत्ता कायम राहत नसते, उद्या आमची वेळ येईल
जरांगे म्हणाले की, सत्ता कायम राहत नसते. ती एका ना एका दिवशी बदलणारच आहे. आणि आम्हीसुद्धा लक्ष ठेवून आहोत. ज्यावेळेस सत्ता बदलेल, त्यावेळेस तुमच्याही चौकशा जशास तशाच होणार. सुट्टी अजिबात देणार नाही. तुम्ही जितके खुनशी आहात, त्याच्या दुप्पट मी आहे. आम्ही न भोगलेले भोग भोगायला तयार आहोत. उद्या तुमची वेळ असणार आहे, असा इशाराही त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिला.