छत्रपती संभाजीनगर : प्रदीर्घ खंडानंतर मराठवाड्यात सोमवारी (दि. २१) पावसाचे दमदार पुनरागमन झाले. विभागातील ३० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ४३.८ मिमी तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी ९. १ मिमी पाऊस झाला.
जुलैच्या सुरुवातीपासून मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. सोमवारी (दि.21) रोजी रात्री मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळला. दिवसभरात आठही जिल्हे मिळून २६. १ मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक ४३.८ मिमी पाऊस परभणी जिल्ह्यात तर
सर्वात कमी ९. १ मिमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोसळला आहे. विशेष म्हणजे विभागातील ३० सर्कलमध्ये अतिवृष्टीचे नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये जालन्यातील ६, बीडमधील ६, लातुरातील १, धाराशिव २, नांदेड २, परभणी ९, हिंगोली ४ सर्कलमध्ये ६५पेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. जवळपास आठ दिवसांपासून कोरडा राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातदेखील सोमवारी (दि.21) रात्री पावसाने हजेरी दिली. मात्र विभागात सर्वात कमी पाऊस संभाजीनगरात कोसळला. जुलै महिन्यासाठी जिल्ह्याची सरासरी १०८ मिमी आहे. १ जुलैपासून संभाजीनगरात ४८.५ मिमी पावसाने हजेरी दिली आहे.
जालना : गोंदी, वडिगोद्री,
सुखापुरी, आष्टी, सातोना, तालानी.
बीड : गेवराई, धोंडराई, रेवाकी, केज, सिरसाळा, पिंपळगाव.
लातूर : हिसामाबाद.
धाराशिव : इटकाल, भूम.
नांदेड : मुखेड, मालेगाव.
परभणी : बाभळगाव, हादगाव, केसापुरी, बोरी, वाघी धानोरा, चिकलठाणा, मोरेगाव, सोनपेठ, केकरजवळा.
हिंगोली : अंबा, औंढा, सलाना, जवळा