Maharashtra Chhatrapati Sambhajinagar rain alert news
पिशोर: नाचनवेल व पिशोर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून अंजना नदीने रुद्रावतार धारण केल्याने नदीकाठच्या भागात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या पाण्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून गावातील मंदिरे, स्मशानभूमी तसेच सार्वजनिक ठिकाणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.
पिकांचे मोठे नुकसान
अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाले आहेत. शेतात उभे असलेले सोयाबीन, कापूस, मका व भाजीपाला पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी शेतात तुडुंब पाणी साचल्याने शेतकरी हतबल झाले असून एका झटक्यात हंगामी कष्ट पाण्यात गेल्याने मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
वाहतूक ठप्प
दरम्यान, मुसळधार पावसाच्या तडाख्याने काही ठिकाणी पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे.
प्रशासनाकडे मागणी
गावकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
हवामान विभागाचा इशारा
दरम्यान, परिसरात अजूनही ढगाळ वातावरण कायम असून पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.