

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात सोमवारी (दि.२२) सरासरी ३८ मिमी पाऊस झाला. गोळेगाव (७१ मिमी), अजिंठा (६८ मिमी) आणि आमठाणा (६७ मिमी) या मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या आठ दिवसांत आमठाणा मंडळात तिसऱ्यांदा मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे तालुक्याचे जनजीवन अक्षरशः दुष्काळ झाले आहे. पूर्णा, खेळणा व चरणा या नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे.
तालुक्याची वार्षिक पावसाची सरासरी ६७२ मिमी असताना यंदा आतापर्यंत ७१५ मिमी पाऊस झाला आहे. अजून जवळपास तीन आठवडे पावसाळा बाकी असून सततच्या पावसामुळे चरणा नदीने तिसऱ्यांदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांसह पंचक्रोशीतील लोकांना सतत भीतीच्या छायेत राहावे लागत आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतजमिनी वाहून गेल्या असून उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आला आहे. जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर झाला असून शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवर गदा आली आहे. केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. परिणामी या भागातील जनजीवन विस्कळीत होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दि.२१ सप्टेंबरच्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे खेळणा, पूर्णा आणि चरणा नद्यांना पूर आला. परिणामी केळगाव, आमठाणा, देऊळगाव बाजार, चारणेर, बोरगाव बाजार, बोरगाव सारवाणी, सोनपावाडी, बोरगाव वाडी, सावखेडा खुर्द व सावखेडा बुद्रुक आदी गावांत पाणी शिरले.
चारणेर गाव अक्षरशः पाण्यात गेले असून घाटनांद्रा–चारणेर रस्ता बंद झाला आहे. यामुळे चारणेरसह सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, बोरगाव सारवाणी, बोरगाव बाजार व सोनपावाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक रस्त्यांवर पाणी वाहत असल्याने वाहतूक खंडित झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
केळगाव, खेळणा, पेंडगाव–चारणेर, निल्लोड, रहिमाबाद आणि उंडणगाव ही धरणे पूर्ण भरून वाहत आहेत. अजिंठा–अंधारी व हळद–डकला धरणे भरून जाण्याच्या मार्गावर आहेत. उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण व तहसीलदार सतीश सोनी यांनी सर्व विभागांना २४ तास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
सततच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी जोरदार मागणी होत आहे. शेतकरी व सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी एकमुखी भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, पाऊस सातत्याने सुरू असल्याने आणखी भीषण परिस्थिती निर्माण होईल की काय, या भीतीचे वातावरण शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे.