छत्रपती संभाजीनगर : शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलत आहे. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत प्रस्तावित नवीन स्थानकाचे काम वेगात सुरू असून, वाढती प्रवासी संख्येला आणि भविष्यातील रेल्वे वाहतुकीला पूरक अशा पद्धतीने स्थानकाचा विकास केला जात आहे. या इमारतीत ७२ मीटरचा एअर कॉन्कोर्स अन् आधुनिक सोयी सुविधां उपलब्ध राहणार आहेत. हे काम डिसेंबर-२०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र तब्बल २७ हजार ७३ चौरस मीटर राहणार आहे. सध्याच्या इमारतीचे क्षेत्रफळ सुमारे ५,६७५ चौरस मीटर आहे. त्या तुलनेत प्रस्तावित इमारत जवळपास पाचपट मोठी राहणार आहे.
उत्तर बाजूची इमारत २२,१८० चौ.मी., तर दक्षिणेकडील इमारत ४,८९३ चौ.मी. क्षेत्रात उभारण्यात येत आहे. सर्व प्लॅटफॉर्मना जोडणारा ७२ मीटर रुंदीचा डबल-लेव्हल एअर कॉन्कोर्स या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सुमारे २४१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नव्या इमारतीची विशेषतः
नव्या इमारतीत प्रवाशांसाठी प्रशस्त प्रवेश व निर्गमन व्यवस्था, स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी शहराशी जोडणी, प्लॅटफॉर्म, ४ पादचारी पूल, चार सरकते जीने, लिफ्ट आणि प्रवासी सुविधांचे आधुनिकीकरण, प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षालय व आधुनिक सुविधा, स्थानक परिसराचे सुशोभीकरण आणि सुधारित वाहतूक व्यवस्था, भविष्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची क्षमता वाढविण्याचे नियोजन.
मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला चालना
मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठीही विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित २४० किलोमीटर नव्या रेल्वेमार्गाच्या डीपीआरला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या रेल्वेमार्गांची जोडणी यामुळे छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील महत्त्वाचे रेल्वे केंद्र म्हणून समोर येणार आहे. याच कामांचा सोमवारी (दि. २४) खासदार संदीपान भुमरे यांनी आढावा घेतला. अपूर्ण कामे नियोजित वेळेत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांसह ठेकेदारांला दिल्या.