Chhatrapati Sambhajinagar crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : थेट पोलिस ठाण्यातच गावगुंडाची हॉटेल चालकाला दांड्याने मारहाण

'हॉटेलमध्ये गांजा टाकून अडकवण्याची धमकी; एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : स्वतःच्या जमिनीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला एका सराईत गावगुंडाने पोलिसांसमोरच बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी (दि. २२) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. हद्द म्हणजे आरोपीने चक्क पोलिस ठाण्यातच पोलिसांना शिवीगाळ करत, तक्रारदारावर आणि विटेने लाकडी दांडक्याने हल्ला चढवला. तसेच 'तुझ्या हॉटेलमध्ये गांजा टाकून तुला अडकवतो', अशी धमकीही दिली. संतोष बन्सी जाधव (रा. सिंदीबन) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी अंकुश अशोक दहीहंडे (३८, रा. चिखलठाणा गाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. रविवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या जमिनीसंदर्भात तक्रार देण्यासाठी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गेले होते.

तेथील अंमलदारांशी ते बोलत असताना, आरोपी संतोष जाधव हा तिथे आला आणि तो जोरजोरात ओरडत पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ करू लागला. याच वेळी त्याची नजर दहीहंडे यांच्यावर पडली. त्याने त्यांच्या शिवीगाळ करत थेट त्यांच्या दिशेने धाव घेतली आणि खाली पडलेली विटकर उचलून त्यांच्यावर भिरकावली. मात्र, दहीहंडे खाली बसल्याने हा वार हुकला. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने पोलिस ठाण्यात पडलेल्या लाकडी दांडक्याने त्यांच्या पायावर वार करून मारहाण केली.

तू बाहेर ये, तुझा काटाच काढतो...

पोलिसांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तुझ्या हॉटेलमध्ये गांजा टाकून तुला अडकवतो, तू ठाण्याच्या बाहेर ये, तुझा काटाच काढतो, अशी उघड धमकी त्याने पोलिसांसमोरच दिली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दहीहंडे यांची त्याच्या तावडीतून सुटका केली.

दहशतीमुळे कोणीही करत नाही तक्रार

आरोपी संतोष जाधव हा अत्यंत गुन्हेगारी आणि धोकादायक प्रवृत्तीचा असून, नशा केल्यावर तो नेहमी सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास देतो. मात्र त्याच्या खुनशी स्वभावामुळे व दहशतीमुळे कोणीही त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास पुढे येत नाही, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार जहीर शेख करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT