ज्या भागात नशेचा बाजार केला तिथेच पोलिसांनी बेड्या घालून रस्त्याने आरोपींची अशी धिंड काढत माज उतरविला. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar Crime : ड्रग्ज माफियांच्या टोळीची बेड्या घालून काढली धिंड

पोलिसांकडून माज उतरविण्यास सुरुवात ः ड्रग्ज सिंडिकेटला सडेतोड उत्तर

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तरुणाईला नशाखोरीच्या विळख्यात ढकलणाऱ्या ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळल्यानंतर, आता पोलिसांनी त्यांचा माज उतरविण्यास सुरुवात केली आहे. बंद मेडिकलच्या नावावर कोडीन सिरपचा साठा मागवून नशेखोरांना विक्री करणाऱ्या कुख्यात अश्पाक पटेल टोळीतील पाच आरोपींना आज पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला. इतकेच नव्हे, तर भररस्त्यातून त्यांची धिंड काढून पोलिसांनी ड्रग्ज सिंडिकेटला जशास तसे उत्तर दिले आहे.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जिन्सी भागात ड्रग्ज सिंडिकेट चालविणारा कुख्यात अश्पाक पटेल गॅंगच्या नांग्या ठेचल्या आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकांनी पाच छापे मारून 12 हजार कोडीन सिरपच्या बाटल्या जप्त केल्या असून आतापर्यंत 12 आरोपींना जेरबंद केले आहे. या सिंडिकेटचा सूत्रधार कुख्यात अश्पाक पटेल हा सध्या फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

मंगळवारी (दि.3) पटेल गॅंगचा मुख्य पुरवठादार आरोपी आबेदुल्ला अब्दुल्ला खान (32, रा. किराडपुरा, मूळ मालेगाव), शेख सोफियान शेख नजीर (34, रा. बायजीपुरा), अब्दुल नवीद खान अब्दुल समी खान (31, रा. जिन्सी ठाण्याजवळ), शेख नावेद शेख हमीद (25, रा. फाजलपुरा) आणि कुख्यात तेजाचा काका शेख अय्याज ऊर्फ शेरू शेख सिराज (42, रा. किलेअर्क) या आरोपीना 3 हजार सिरप बाटल्यासह अटक केली होती.

नार्कोटिक्स सेलचे सहायक निरीक्षक रविकांत गच्चे आणि उपनिरीक्षक संदीप काळे यांच्या पथकाने आज शुक्रवारी (दि. 6) अटक केलेल्या पाच मुख्य आरोपींना बेड्या ठोकून जुन्या शहरात आणले. चंपा चौक, शहाबाजार, जिन्सी आणि शहागंज या गजबजलेल्या भागांतून या गुंडांची पायी धिंड काढण्यात आली. पोलिसांनी दाखविलेल्या या खाकीचा इंगा पाहून परिसरात ड्रग्ज माफियांची दहशत मोडीत निघाली असून, नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

स्थानिक पोलिस करतात काय?

जिन्सी, सिटी चौक आणि परिसरात पाय पसरलेल्या या ड्रग्ज सिंडिकेटच्या नांग्या ठेचण्यासाठी गुन्हे शाखा आता अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यातुलनेत स्थानिक पोलिस ठाण्यातील डीबी पथके काय कामगिरी करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक पोलिसांच्या याच ढिलाईमुळे ड्रग्ज टोळ्यांचे मनोबल उंचावले असून, त्यांचा नशेचा बाजार बिनबोभाटपणे सुरू होता हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT