Sambhajinagar Pishor Police Liquor Seizure  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Illegal Liquor Raid | पिशोर पोलिसांची अवैध दारूविरोधात धडक मोहीम; दोन कारवायांत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Pishor Police Liquor Seizure

पिशोर : पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन स्वतंत्र गुन्हे उघडकीस आणले. या कारवायांमध्ये तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १ लाख १२ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून परिसरातून पिशोर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई १४ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचोली-करंजखेड मार्गावरील वाकी फाटा येथे करण्यात आली. अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरून दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले.

शेख गालेप शेख साबेर (वय ५५) आणि सुनील साहेबराव साळवे (वय ३५, दोघे रा. नागापूर, ता. कन्नड) यांच्याकडून ‘देशी दारू संजीवनी संत्रा’ ब्रँडच्या ९० मिली क्षमतेच्या ३५० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत २१ हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ८५ हजार रुपये किमतीची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व ६५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसरी कारवाई १५ जून रोजी पहाटे नेवपूर शिवारातील नाल्याजवळ करण्यात आली. येथे हिरामन लहु माळी (वय ३५, रा. नेवपूर, ता. कन्नड) हा बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे ९१ लिटर रसायन, ज्याची किंमत ४ हजार ५५० रुपये आहे, तसेच १४ लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, किंमत १ हजार ६८० रुपये, असा एकूण ६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व ६५ (फ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष भिवसने करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि कन्नड उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, गणेश कव्वाल, पोलीस कॉन्स्टेबल अन्सार पटेल, देवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

अवैध दारू निर्मिती आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेली मोहीम भविष्यातही अधिक तीव्र करण्यात येणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT