व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना महापौर समीर राजूरकर. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Pay and Park Scheme : मनपाच्या पे-अँड-पार्क धोरणाला व्यापाऱ्यांसह नागरिकांचा विरोध

नगरसेवकांच्या उपस्थितीत आयुक्तांना निवेदन : महापौरांकडून तोडग्यासाठी बैठकीचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पे अँड पार्क धोरणाला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून क्रांती चौक ते गोपाळ टी चौक, उत्सव चौक व गोपाळ टी चौक ते स्टेशन रोड, उस्मानपुरा या व्यापारी मार्गावरील प्रस्तावित पे-अँड पार्क योजना रद्द करण्याची मागणी केली.

यासंदर्भात सोमवारी (दि. २३) नगरसेवकांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन दिले. त्यानंतर महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन व्यापारी आणि नागरिकांची भूमिका मांडली. यावर महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी व्यापाऱ्यांसह विरोध करणाऱ्या नगरसेवकांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, क्रांती चौक ते गोपाळ टी चौक, उत्सव चौक व गोपाळ टी चौक ते स्टेशन रोड, उस्मानपुरा या मार्गांवर ही योजना प्रस्तावित आहे. महागाई आणि आर्थिक मंदीमुळे आधीच अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यांवर पार्किंग शुल्काचा अतिरिक्त भार पडल्यास ग्राहकांची संख्या घटून व्यवसायावर परिणाम होईल, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

अरुंद आणि वर्दळीच्या रस्त्यांवर पार्किंगची पुरेशी जागा नसताना शुल्क आकारणी सुरू केल्यास वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले. या शिष्टमंडळात नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, शोभा बुरांडे, डॉ. सविता सोळुंके, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, नवीनसिंग ओबेराय यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी ज्ञानेश्वर खर्डे, लक्ष्मीनारायण राठी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. योजना तातडीने रद्द करून अंमलबजावणी थांबवावी, कोणत्याही कंत्राटदाराच्या हितासाठी व्यापारी व नागरिकांचे नुकसान करू नये, अशी मागणी करण्यात आली.

अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, तत्कालीन प्रशासक जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळात गुजरातमधील कंपनीला सात रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर काम देण्यात आले होते. अल्प प्रतिसाद आणि विरोधामुळे काम थांबले. नंतर पुन्हा सुरू झाले. क्रांती चौक आणि कॅनॉट गार्डन परिसरातही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विरोध झाला होता.

व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

प्रस्तावित पार्किंग योजना कायमस्वरूपी रद्द करून अंमलबजावणी थांबवावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास व्यापारी आणि नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT