Shop Looted Paithan
पैठण: पैठण-शेवगाव रोडवरील चोरी आणि लुटमारच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (दि.१) रात्री शहागड फाट्यावर आणखी एक घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी सागर मशिनरी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि सीसीटीव्ही कॅमेरे तसेच विद्युत मोटर साहित्य असा मिळून तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यापूर्वीही या मार्गावर लुटमारच्या घटना घडल्या आहेत. श्रावण महिन्यात देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविक दांपत्याची पाटेगाव येथे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांच्या मदतीने इराणी टोळीतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, त्याच टोळीतील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खाडे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या सलग घडणाऱ्या चोरी आणि लुटमार प्रकरणांमुळे पैठण-शेवगाव रोड परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना गजाआड करण्याची मागणी जोर धरत आहे.