नगरसेवकाला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Paithan Crime | अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी नगरसेवकाच्या अटकेची मागणी; नातेवाईकांचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार नातेवाईकांनी व्यक्त केल्याने पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Paithan Minor Boy Killed

पैठण : पैठण शहरातील इंदिरानगर परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या निर्घृण खूनप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी बुधवारी (दि.३) पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार नातेवाईकांनी व्यक्त केल्याने पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर येथील रहिवासी अमोल देविदास अहिरे (वय १७) याच्यावर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका रुग्णालयासमोर प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमोलचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत अमोलचे वडील देविदास शशिकांत अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपी साईनाथ विकास पवार, विकास पवार तसेच पैठण नगर परिषदेचे शिवसेना गटनेते तथा नगरसेवक ईश्वर भाऊसाहेब दगडे यांच्याविरुद्ध खून आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, गुन्हा दाखल होऊनही नगरसेवकाला अटक करण्यात आलेली नसल्याने संतप्त नातेवाईकांनी बुधवारी सकाळी थेट पोलीस ठाणे गाठले. आरोपी नगरसेवकाला तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस ठाण्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तपासादरम्यान इतर आरोपींची नावे समोर आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच नगरसेवक ईश्वर दगडे यांना तीन तासांत अटक करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी देत शांततेत अंत्यविधी करण्याचे आवाहन केले.

मात्र, आरोपींच्या अटकेच्या मागणीवर नातेवाईक ठाम राहिल्याने आंदोलन सुरूच होते. या खूनप्रकरणामुळे इंदिरानगर परिसरासह शहरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT