Death Certificate pudhari
छत्रपती संभाजीनगर

Birth Death Certificate : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी झोन कार्यालयात नागरिकांच्या फेऱ्या सुरूच

ऑनलाईन अर्ज, तरीही हार्ड कॉपीचा हट्ट : कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची आयुक्तांनी घेतली दखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया ऑनलाइन केली. मात्र प्रत्यक्ष कार्यालयीन कामकाजातील पद्धतीत फारसा बदल झालेला नसल्याचे चित्र आहे. ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतरही काही झोन कार्यालयांमध्ये नागरिकांकडून लेखी अर्ज, कागदपत्रांच्या छायांकित प्रती आणि हार्ड कॉपी मागितली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ऑनलाइन सेवेचा लाभ घेऊनही नागरिकांना पुन्हा झोन कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

कर्मचाऱ्यांच्या या कार्यपद्धतीची दखल घेत अर्जदारांकडून हार्ड कॉपी मागू नये, याबाबत सर्व झोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या जातील, असे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

महापालिकेच्या ऑनलाइन सुविधेमुळे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज घरबसल्या करण्याची तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज क्रमांक दिल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांकडून त्याच कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती मागितल्या जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कागदपत्रे ऑनलाइन स्वीकारण्याची व्यवस्था असताना पुन्हा हार्ड कॉपी का द्यायची,असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतरही प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी नागरिकांना वारंवार झोन कार्यालयात जावे लागत आहे. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एजंटामार्फत अर्ज केल्यास प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया तुलनेने सुलभ होते.

त्यामुळे ऑनलाइन सेवा सुरू करूनही प्रत्यक्ष कागदपत्रे स्वीकारण्याची पद्धत कायम असल्याने महापालिकेच्या स्मार्ट वर्कवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, दोन-तीन आठवड्यांपूर्वी आयुक्त अमोल येडगे यांनी झोन कार्यालयांची पाहणी करून जन्म-मृत्यू विभागातील कामकाज आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला होता. ऑनलाइन शुल्क भरण्यातील अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत. मात्र, हार्ड कॉपीच्या मागणीमुळे नागरिकांचा त्रास कायम असल्याच्या तक्रारी आहेत.

महापालिकेने नागरिकांच्या विविध सेवा ऑनलाइन केल्या आहेत. एका क्लिकवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने या सेवांचा वापरही वाढत आहे. यात जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज, कागदपत्रे अपलोड करणे आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.

ऑनलाईन कागदपत्रे पुरेशी

ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर नागरिकांना शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन लिंक पाठविली जाते. शुल्क भरल्यानंतर प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ऑनलाइन अर्जासोबत कागदपत्रे अपलोड केलेली असल्यास पुन्हा लेखी अर्ज किंवा कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घेण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन अर्जदारांकडून हार्ड कॉपी मागू नये, याबाबत सर्व झोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या जातील, असे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT