नितीन थोरात
वैजापूर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सोमवारी (१८ मे) सकाळी समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादन खर्चही निघत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारने कांद्याला तातडीने हमीभाव द्यावा, निर्यातबंदीचे निर्णय मागे घ्यावेत तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “कांद्याला योग्य भाव द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
दरम्यान, या आंदोलनासाठी पोलिस प्रशासनाने सुरुवातीपासूनच परवानगी नाकारली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी आंदोलनास विरोध दर्शविला होता. मात्र, तरीही ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन छेडल्याने घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी आमदार दानवे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. सरकार फक्त घोषणा करत आहे; मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचे दर घसरले असून उत्पादन, वाहतूक आणि साठवण खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे.