छत्रपती संभाजीनगर : जे.ई. देशकर
व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर चारचाकी सीएनजी आणि एलपीजी वाहनांवर किमतीनुसार ७ ते ९ टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते. या कराच्या दरामध्ये १ टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. या वाढीव कर वसुलीच्या नियमांची अंमलबजावणी १ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे. त्यामुळे नवीन वाहन घेणाऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.
३० लाखांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, परंतु इलेक्ट्रिक वाहनांवरील कर माफ करण्यात आला असल्याने एलपीजी, सीएनजी वाहन खरेदी करणाऱ्यांना मात्र जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एक्सॅव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना एकरकमी वाहन किमतीच्या ७ टक्के दराने मोटार वाहन कर आकारला जाणार आहे. त्यामुळे बांधकामांसाठी वापरण्यात येणार्या वाहनांच्या किमतीतही वाढ झाली आहे.
वाहन करात वाढ केल्याने वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसत आहे. कुठलेही वाहन खरेदी करताना त्याची एक्स शोरूम प्राईस आणि ऑन रोड प्राईस यात फरक आढळतो. शोरूममधून कार प्रत्यक्षात रस्त्यावर येईपर्यंत अनेक कर आकारले जातात. त्यात मोटार वाहन कर हा राज्य सरकार आकारते. त्यात वाढ झाल्याने कारच्या किमतीतही वाढ झाली आहे. कर वाढीची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
२०१७ नंतर वाहन करात वाढ झाली आहे. आजघडीला दुचाकीसाठी ९,१० ते ११ टक्के, चारचाकीसाठी ११ ते १३, तर डिझेलसाठी १३ ते १५ टक्के कर आकारला जातो. याच बरोबरच आता सीएनजी आणि एलपीजी वाहनांच्या करात एक टक्क्याने वाढ झाल्याने त्यांच्याही किमतीत वाढ झाली आहे, अशी माहिती वाहन विक्रेत्याच्या वतीने देण्यात आली. वाहनांचा टॅक्स वाहनांच्या किमतीवर टक्केवारीत ठरवण्यात येतो.