छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत समोरच्या बाकावर बसण्यावरून एमआयएम-वंचितमध्ये तर पाणी योजनेच्या अभिनंदन ठरावावरून सत्ताधारी भाजप आणि ठाकरे सेनेत खडाजंगी झाली. या वादानंतर सभा सुरळीत सुरू झाली. मात्र सभेच्या शेवटी महाराणा एजन्सीला दीड वर्षापूर्वी २२ कोटींचे अतिरिक्त देयक देऊन ते वसूल का केले नाही, म्हणत एमआयएमने प्रशासनाला घेरले अन् त्यावरून सत्ताधारी विरोधकांत जुंपली. अखेर २२ खोके एकदम ओकेच्या घोषणांनी सभागृह दणाणले. त्यामुळे पहिलीच सभा महापौर समीर राजुरकर यांना विरोधकांच्या गोंधळामुळे राष्ट्रगीत घेत गुंडाळावी लागली.
महापालिकेतील साडेपाच वर्षांच्या प्रशासकराजनंतर जानेव -ारीत निवडणुका झाल्या. या कार्यकाळानंतर शुक्रवारी महापालिकेची पहिलीच नियमित सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभा शिस्तीत आणि सर्वसाधरण सभेच्या नियमावलीचे पालन करूनच होईल. त्यामुळे सदस्यांनी गोंधळ घालून सभेचे कामकाज बिघडणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना अगोदरच महापौर राजुरकर यांनी सर्व सदस्यांना केली होती. परंतु या सूचनेनंतरही सदस्यांनी गोंधळ घातलाच.
सभेला सुरुवात होताच सभागृहात समोर बसण्यावरून वाद झाला. एमआयएमच्या गटनेत्याला समोरच्या बाकावर जागा मिळावी, अशी मागणी विर-ोधीपक्ष नेता अब्दुल समीर बिल्डर यांनी महापौर राजुरकर यांच्याकडे केली. तर सभागृहात बसण्याचे कोणतेच नियम नाहीत, असे सांगून महापौरांनी सभेचे कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र यावर नाराजी व्यक्त करीत अब्दुल समीर यांनी सभागृहात ठिय्या केला.
अखेर वंचितचे गटनेता अफसर खान आणि एमआयएम सदस्यांमध्ये जुंपली. हा वाद संपल्यानंतर सभेला सुरुवात झाली. भाजपकडून नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अभिनंदनाचा ठरावा मांडण्यात आला. यास अनुमोदन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भगवत कराड यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन झाल्याने त्यांचेही अभिनंदन करण्यात यावे, असे ठाकरे सेनेचे गटनेता गणेश लोखंडे म्हणाले. त्यास भाजपकडून विरोध करण्यात आला अन् त्यावरून सत्ताधारी विरुद्ध ठाकरे सेना यांच्या खडाजंगी झाली. अखेर महापौरांनी ठाकरे सेनेच्या सहा नगरसेवकांना बाहेर काढण्याचे आदेश सुरक्षारक्षकांना दिले. त्यावर महापौरांच्या निषेधाच्या घोषणा सदस्यांनी दिल्या. अखेर सुरक्षारक्षकांनी लोखंडे, माजी महापौर रशीद खान यांना उचलून बाहेर नेले.
एमआयएम-भाजपमध्ये जुंपली
महाराणा एजन्सीला बिलामध्ये दिलेले अतिरिक्त २२ कोटींचे देयके महापालिकेने परत का घेतले नाही, असे म्हणत एमआयएमचे नगरसेवक फेरोज खान यांनी सवाल उपस्थित केला. परंतु या प्रश्नाचे प्रशासनाने लेखी उत्तर दिल्याने उपप्रश्न उपस्थित करा, असे महापौर यांनी सांगितले. त्यावर सदस्य खान हे निरुत्तर झाल्याचे पाहून त्यांच्या मदतीला विरोधी पक्षनेता अब्दुल समीर हे सरसावले. परंतु हा अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी केला अन् त्यावरून एमआयएम-भाजपमध्ये जुंपली. २२ खोके एकदम ओकेच्या घोषणा एमआयएमने दिल्या.
एमआयएमला संभाजीनगरचे वावडे
सभागृहात उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सफारी पार्कला छत्रपती संभाजी राजे भोसले सफारी पार्क, असे नाव देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर बोलताना उपमहापौरांनी शहराच्या नामकरणाचा ठराव घ्यावा, असे म्हणताच एमआयएमच्या सदस्यांनी सभात्याग करत सभागृह सोडले. त्यावर एमआयएमला संभाजी महाराजाचे एवढे वावडे का, असा सवाल केला.
दडपशाहीचा निषेध असोच्या घोषणा
गटनेते गणेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली उबाठाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेरच ठिय्या देत सभा संपेपर्यंत आंदोलन केले. महापौरांच्या दडपशाहीविरोधात जोरदार घोषणा देत सभागृहाबाहेरचा परिसर दणाणून टाकला. यावेळी नगरसेवक रशीद खान, सचिन खैरे, वैशाली कोरडे, सावित्रीबाई वाणी यांचा समावेश होता.
माजी महापौरांनी उचलला राजदंड
पाणीपुरवठा योजनेवरून निर्माण झालेल्या वादंगावर उबाठाच्या सहा नगरसेवकांनी भाजपला घेरले. सभेत प्रचंड गोंधळ घालत माजी महापौर तथा नगरसेवक रशीद मामू खान यांनी सर्व सुरक्षा भेदत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु महापौर समीर राजुरकर, उप महापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह सुरक्षारक्षकांनी राजदंड पकडला. या गोधळानंतर महापौरांनी सदस्यांना बाहेर काढले.