छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा :
महापालिका निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे यंदा २९ प्रभागांतील ११५ वॉडाँसाठी आठ दिवसांत तब्बल १ हजार ८७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मंगळवारी शेवटच्या दिवशी पाच तासांत सुमारे १६०० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
रात्री उशिरापर्यंत सर्वच निवडणूक कार्यालयांत उमेदवारी अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू होती. या अर्जाची आज (दि.३१) छाननी होणार असून, त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी शहरात ९ निवडणूक कार्यालय निश्चित करण्यात आले आहेत.
या कार्यालयातून मागील आठ दिवसांत तब्बल सात हजार इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले. त्यामुळे यंदा इच्छुकांमध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रचंड उत्सुकता आहे, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज अतिशय किचकट स्वरूपाचा असल्याने त्याचे वाचन करून सविस्तर भरण्यासाठी अनेकांनी तीन ते चार अर्ज नेले होते.
दरम्यान, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी सर्व ९ निवडणूक कार्यालयांत उमेदवारी दाखल करण्यासाठी सकाळी ११ वाजेपासूनच उमेदवारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयातून उमेदवारी विक्रीसाठी मुदत होती. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. सर्वच कार्यालयांत ३ वाजताच उमेदवारांना आत प्रवेश देणे बंद करण्यात आले.
यात काही कार्यालयांत गर्दी कमी करण्यासाठी उमेदवारांसोबत केवळ सूचक, अनुमोदक यांनाच प्रवेश देण्यात आला. तसेच टोकण देऊन अर्ज तपासणीसाठी देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत हे दाखल अर्ज निवडणूक आयोगाच्या साईटवर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. सर्व २९ प्रभागातील ११५ वॉर्डासाठी १८७० उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.