छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने कंत्राटी कामगार पुरवण्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात सीआयएसबी प्रा.लि., ओमसाई मॅनपॉवर सर्व्हिसेस प्रा.लि., मेडिएटर्स अॅण्ड अजिंठा सेक्युरिटीज प्रा.लि आणि सिंघ इंटेलिजन्स सेक्युरिटीज प्रा.लि. या चार एजन्सीची निवड करण्यात आली आहे.
यातील तीन शहरांतील तर चौथी मुंबईतील एजन्सी असून चारही एजन्सींना प्रत्येकी ९० लाख रुपये अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे नववर्षापासून या एजन्सी काम सुरू करतील, असे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेला मागील दहा वर्षांपासून महाराणा एजन्सीकडूनच कंत्राटीतत्त्वावर कामगार पुरविण्यात येत होते. मात्र, पाच वर्षांपासून महाराणासोबतच गॅलेक्सी आणि अशोका या एजन्सींनाही कंत्राटी कामगार पुरविण्याचे काम महापालिकेने दिले. मात्र, सर्वात जास्त कामगार पुरविण्याचे काम हे महाराणाकडेच होते. या एजन्सीकडून कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिले जात असल्याची ओरड झाली. त्यावरून प्रशासक जी. श्रीकांत यांनी चौकशी करून तडकाफडकी महाराणाचे काम बंद केले. त्यांच्याकडील सर्व कामगार गॅलेक्सी आणि अशोकाकडे वर्ग केले. त्यासोबतच नव्या एजन्सीसाठी निविदा प्रक्रिया राबविली.
यात आता चार एजन्सींना प्रत्येक ५०० या प्रमाणे कंत्राटी कामगार पुरविण्याचा परवाना दिला जाणार आहे. यात कोणत्या एजन्सीने कोणत्या प्रकारचे कामगार पुरवावे, याबाबत वर्कऑर्डरमध्ये नमूद राहणार आहे. सध्या चारही एजन्सींना प्रत्येकी ९० लाख रुपये अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यांच्यासोबतच ३ वर्ष ३ महिन्यांचा करार केला आहे.
कंत्राट नेते, पदाधिकाऱ्यांनाच
सीआयएसबी प्रा.लि., ओमसाई मॅनपॉवर सव्र्हिसेस प्रा.लि., मेडिएटर्स अॅण्ड अजिंठा सेक्युरिटीज प्रा.लि या तीन एजन्सीं छत्रपती संभाजीनगरमधील आहेत. या एजन्सीपैकी दोन एजन्सी या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची असल्याची चर्चा आहे. तर तिसरी ही माजी खासदार उत्तमसिंग पवार यांची एजन्सी आहे.
आता कंत्राटदारांना सर्व्हिस चार्ज
आतापर्यंत कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या एजन्सी कामगारांना कमी वेतन देऊन स्वतःकडे जास्त पैसे ठेवत होते. परंतु, आता महापालिकेने कंत्राट नियुक्त करतांनाच त्यांना फिक्स सर्व्हिस चार्ज देण्याबाबत करार केला आहे. त्यानुसार ३.८ टक्के एवढा हा चार्ज राहणार आहे. त्यामुळे कामगारांच्या वेतनातून त्यांना एक रुपया देखील घेता येणार नाही.