Chhatrapati Sambhajinagar Solar Project pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Solar Project : मनपाच्या सोलर प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

१०० मेगा वॅट वीज निर्मितीची तयारी, सीएसएमआरडीएकडून मिळेल जागा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेला सध्या दरमहा वीजबिलापोटी कोट्यवधींचा भार सहन करवा लागतो. त्यात नवीन पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर आणखी मोठा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पावर महापालिकेने भर देत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे सुरू आहे.

हे काम अंतिम टप्प्यात असून या अहवालाद्वारेच १०० मेगा वॅट प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाकडून (सीएसएमआरडीए) किती जागेची मागणी करावी, हे स्पष्ट होणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. या योजनेमुळे महापालिकेवर वीज बिलाचा भार मोठ्या प्रमाणावर पडणार आहे. सध्या दर महिन्याला सुमारे साठ लाख रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी वीज बिल म्हणून भरावे लागत आहेत.

अद्याप योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली नाही. परंतु, जलवाहिनीतून पाण्याची चाचणी घेण्यासाठी महापालिकेने वीज कनेक्शन घेतले आहे. त्याचे मागील दोन महिन्यांत लाखो रुपये वीजबिलापोटी भरणा करावा लागला आहे. योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर वीज बिलामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती आणखीच नाजूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच महापालिकेने सौर ऊर्जा प्रकल्पावर भर दिला आहे.

सोलार प्रकल्पासाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती देताना आयुक्त अमोल येडगे म्हणाले की, या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पंधरा दिवसांत तो तयार होणार असून या अहवालानुसारच सोलार प्रकल्पासाठी नेमक्या किती जागेची मागणी छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाकडे करणे आवश्यक आहे, हे स्पष्ट होईल. सीएसएमआरडीएकडून जागा देण्यात येईल, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे. परंतु, डीपीआर तयार झाल्यानंतर सविस्तर प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे आयुक्त येडगे म्हणाले.

मनपा कार्यालयातही सौर ऊर्जा

महापालिकेच्या मुख्यालयासह टप्पा क्रमांक ३ आणि इतर सर्व झोन कार्यालये, उद्यान, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि इतर कार्यालयांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT