

दिलीप जाधव
कवठेमहांकाळ : सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या 11 कंपन्यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात 103 सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यांची एकत्रित वीज निर्मिती क्षमता तब्बल 679 मेगावॅट आहे. आतापर्यंत 192 मेगावॅट क्षमतेचे 28 प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत, तर 223 मेगावॅट क्षमतेचे 29 प्रकल्प लवकरच कार्यान्वित होत आहेत. याशिवाय 264 मेगावॅट क्षमतेचे 46 प्रकल्प प्रस्तावित असून, हे सर्व 103 प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर सांगली जिल्ह्यात सौरऊर्जा क्षेत्रात नवी क्रांती घडणार आहे. उजेडाच्या या क्रांतीमुळे केवळ वीज निर्मितीच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा देखील चेहरामोहरा बदलणार आहे. रात्रीच्या वेळेस जीव धोक्यात घालून, सर्पदंशाची भीती आणि अपघाताचा धोका पत्करत पिकांना पाणी देण्याची वेळ आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.
अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रामुख्याने रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अंधारात कृषी पंप चालू करणे, पिकांना पाणी देणे आणि शेतीची देखभाल करणे या सर्व कामांमध्ये मोठ्या अडचणी येत असतात. अनेकदा अपघात, सर्पदंश यांसारख्या घटनांमुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी सरकारने सौरऊर्जा प्रकल्पांना गती देत दिवसा शेतीला वीज पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जा निर्मितीचा मास्टर प्लॅन आखण्यात आला आहे. शेतीस पर्यावरणपूरक आणि शाश्वत वीजपुरवठा करण्याचे सरकारचे ध्येय आहे.
सांगली जिल्ह्याच्या भौगोलिक आणि हवामानाच्या वैशिष्ट्यांमुळे सौरऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. वर्षभर प्रखर सूर्यप्रकाश मिळत असल्याने सौर प्रकल्पांची कार्यक्षमता जास्त राहते. विशेषतः दुष्काळी भागातील मोकळी जमीन प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी भाड्याने देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेती आणि ऊर्जा या दोन्ही क्षेत्रांचा समतोल विकास होणार आहे.
रोजगार निर्मिती आणि ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात भर
सौरऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे. प्रकल्प बांधकाम टप्प्यात मजूर, यंत्रसामग्री हाताळणारे कामगार, वाहनचालक, पूरक सेवांमध्ये स्थानिकांना संधी उपलब्ध होत आहे. देखभाल, दुरुस्ती, सुरक्षा आणि तांत्रिक सेवांमध्येही कुशल व अर्धकुशल तरुणांना दीर्घकालीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. सौरऊर्जा प्रकल्पांमधून ग्रामपंचायतींना कर आणि विविध शुल्कांच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न वाढत आहे. अतिरिक्त निधीमुळे पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज सुविधा आणि इतर मूलभूत विकास कामांना गती मिळत आहे.