Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Municipal Corporation : मनपा अतिक्रमण, गुंठेवारी विभागात वाढणार मनुष्यबळ

अतिक्रमण विभागासाठी २० कर्मचारी : गरजेनुसार गुंठेवारीसह अन्य विभागातही करणार नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अतिक्रमण आणि गुंठेवारी विभागातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अतिक्रमण विभागासाठी २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, गुंठेवारी विभागातही आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी येडगे म्हणाले,शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाया अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यानुसार अतिक्रमण विभागात २० कर्मचारी कार्यरत केले जाणार आहेत. तसेच गुंठेवारी विभागात प्रकरणांची संख्या आणि कामाचा व्याप लक्षात घेऊन तेथेही मनुष्यबळ आवश्यकतेनुसार वाढविण्यात येणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या इतर विभागांमध्येही कामाचा ताण वाढल्यास आणि प्रत्यक्ष गरज भासल्यासच अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील. प्रत्येक विभागाच्या मागणीची पडताळणी करूनच नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे विनाकारण कर्मचारी वाढविण्याचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन कर्मचाऱ्यांकडून क्षेत्रीय आणि सहाय्यक स्वरूपाची कामे करून घेतली जातील. मात्र संबंधित विभागांचे प्रशासकीय नियंत्रण, कारवाईचे अधिकार आणि निर्णयप्रक्रिया नियमित महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांकडेच राहणार आहे. त्यामुळे कामकाजात कोणताही गोंधळ निर्माण होणार नसल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले. या नियुक्त्यांमुळे महापालिकेवर वेतनाचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात येणार आहे.

नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा

प्रशासनाच्या आर्थिक क्षमतेचा विचार करूनच ही व्यवस्था करण्यात येत असून, आवश्यक विभागांना मनुष्यबळ उपलब्ध करून देतानाच आर्थिक शिस्तही कायम ठेवली जाईल. दरम्यान अतिरिक्त मनुष्यबळामुळे अतिक्रमण कारवाया, गुंठेवारीशी संबंधित कामे आणि नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा अधिक प्रभावीपणे व कमी वेळेत होण्यास मदत होईल, असा विश्वास आयुक्त अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT