छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार त्या त्या महापालिकांनी प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन आरक्षण सोडतीच्या तारखेवरूनच संभ्रमावस्थेत दिसत असून, पहिल्यांदा ११ नोव्हेंबर जाहीर केली. त्यानंतर १० नोव्हेंबर आणि आता पुन्हा ११ नोव्हेंबरच जाहीर केल्याने तारखेवरून एकमत होत नसल्याचे दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदे-शाने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली. यात प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार ८ नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज शनिवारी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. तर आरक्षण सोडत घेऊन त्याचा निकला राज्य निवडणूक आयोगाला ११ नोव्हेंबरपर्यंत सादर करायचा आहे. त्यानुसार ही सोडत अगोदर ११ नोव्हेंबर रोजी घेण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. मात्र अचानक तीन दिवसांपूर्वी प्रशासनाने एका पत्रकाद्वारे तारखेत बदल केला.
त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये ही आरक्षण सोडत घेण्याचे ठरले. परंतु या तारखेवर प्रशासनाचे एकमत झाले नसावे, त्यासाठीच प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी विद्यापीठात आयोजित आरक्षण सोडतीच्या रंगीत तालिमवेळी १० ऐवजी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे आरक्षण सोडतीवरच प्रशासन सभ्रमावस्थेत असेल तर पुढील प्रक्रियेचे काय, असा सवाल १०/११ च्या घोळावरून उपस्थित होत आहे.
सोडतीनंतर होणार चित्र स्पष्ट
महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे. प्रत्येक प्रभागात दोन महिला सदस्यांसाठी जागा राखीव राहिल. त्यासोबतच एससी, एसटी प्रभागासाठीचे आरक्षण काढले जाईल. त्या-त्या प्रभागातील जातींच्या उतरत्या क्रमाने आरक्षण काढले जाणार आहे. प्रारूप मतदार याद्या तयार महापालिकेच्या प्रारुप मतदार याद्या ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार होत्या. परंतु सुधारित कार्यक्रमानुसार आता या याद्या १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे सध्या अंतिम तपासणी सुरू असून, जवळपास सर्व १० झोन कार्यालयांच्या या याद्या तयार झाल्या.