छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : लाचखोरी प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह अंमलदार ACBच्या जाळ्यात

या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : तक्रार अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारताना एका सहायक पोलिस निरीक्षकाला आणि पोलिस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.

विशेष म्हणजे, ही धडक कारवाई शुक्रवारी (दि. ५) मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातच करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे शहर पोलिस दलात कमालीची खळबळ उडाली आहे. संजय नागुसिंग बहुरे (वय ४८, सहायक पोलिस निरीक्षक, रा. मयूरपार्क) आणि गोकुळ अनिलराव खटावकर (वय ४३, पोलिस अंमलदार, रा. पिसादेवी) अशी लाचखोरी करणाऱ्यांची नावे आहेत.

तक्रार अर्जावरून मागितली ५० हजारांची लाच

या प्रकरणातील २२ वर्षीय तक्रारदार तरुणाच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी अंमलदार गोकुळ खटावकर याने ५ जून रोजी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) कार्यालय गाठून याविषयी तक्रार नोंदवली.

पोलिस ठाण्यातच रचला सापळा; दोघे रंगेहाथ ताब्यात

तक्रारदाराने दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ५) पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यावेळी अंमलदार खटावकर याने ५० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे याने या भ्रष्टाचारास प्रोत्साहन दिल्याचेही पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या इमारतीतच एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खटावकर आणि बहुरे या दोघांनाही एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कारवाई करणारे अधिकारी व पथक

ही यशस्वी कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे, वाल्मीक कोरे, हवालदार राजेंद्र सिनकर, राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे आणि सी. एन. बागुल यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT