छत्रपती संभाजीनगर: जिल्हा सहकारी दूधउत्पादक संघाची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी जोरदार गदारोळात पार पडली. २०२५-२६ या वर्षात संघाला ८७ लाख ६९ हजार रुपयांचा नफा होऊनही दूध उत्पादकांच्या १ रुपया बोनसच्या मागणीवर अध्यक्षांनी केवळ २० पैसे बोनस देण्याची घोषणा केली. यावरून सभासद आक्रमक झाल्यानंतर अखेर ४० पैसे बोनस जाहीर करून बोळवण करण्यात आली.
अध्यक्ष गोकुळसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बीड बायपास येथील लॉनवर आयोजित सभेत खा. कल्याण काळे, उपाध्यक्ष दिलीप निरपळ, संचालक मंडळ जिल्ह्यातील सभासद संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश पहाडिया यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. दूध संकलन वाढवण्यासाठी जास्तीचा भाव देण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
या दरम्यान खा. काळे यांनी व्यवस्थापकीय संचालक पहाडिया यांना धारेवर धरले. दुग्धजन्य पदार्थांची घटलेली विक्री, मुंबईचा बाटलीबंद दूध पुरवठा बंद पडणे आणि एनडीडीबीच्या कार्यक्रमांना पहाडिया यांची उपस्थिती यावरून, संघ मातीत घालण्यासाठी आलात का? असा जाब विचारला.
सभेत झालेले ठराव
गदारोळात पार पडलेल्या या सभेत संघाचे पोटनियम दुरुस्ती, कन्नड येथील जागेवर व्यापारी संकुल उभारणे, स्वयंसहाय्यता गटांद्वारे दूध संकलन करणे आणि दुग्धशाळेची संरक्षण भिंत बांधणे यांसह विविध वैधानिक ठरावांना आणि दूध उत्पादकांना भावफलक देण्यास मंजुरी देण्यात आली.