खामनदीच्या पात्रात अशा प्रकारे ड्रेनेज मिश्रित पाणी दाखल होत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात इको उद्यानातील फुटलेली ड्रेनेजलाईन. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar | खाम नदीचे १५ कोटी पाण्यात; इको गार्डनमध्ये पसरली दुर्गंधी

छावणीतून नदीपात्रात ड्रेनेजच्या पाण्याची एन्ट्री

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील इतिहासजमा झालेल्या खाम नदीला महापालिकेने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दुर्गंधीमुक्त करून पुनर्जीवित केले. या कामावर सुमारे १५ कोटीचा खर्च झाला आहे. मात्र काही दिवसांपासून या नदीच्या पात्रात छावणीतून मोठ्याप्रमाणात ड्रेनेजमिश्रीत पाणी दाखल होत आहे. त्यामुळे परिसरात उभारलेल्या इको गार्डनमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

महापालिका प्रशासन, छावणी परिषद, व्हेरॉक कंपनी आणि इकोसत्व या चार संस्थांच्या एकत्रित श्रमदानातून ४ वर्षांत दुर्गंधीयुक्त नाला पुन्हा ऐतिहासिक खाम नदीमध्ये रूपांतरित झाला. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी या कामावर विशेष लक्ष केंद्रित केले. प्रशासकांच्या सूचनेने हर्सल ते बनेवाडी या ११.३० किलो मीटर अंतरादरम्यान नदीच्या दोन्ही बाजूंनी दगडी कठडे उभारण्यात आले. १ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. १६ तळे, विविध ४ ठिकाणी उद्यान उभारून खाम नदीला ऑक्सिजन हबमध्ये रूपांतरित केले. तसेच शहराच्या विविध नाल्यांतून नदीपात्रात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीपात्रात सोडले जात असल्याने नदी दुर्गश्रीमुक्त झाली आहे. या कामासाठी व्हेरॉकने सीएसआर निधी दिला. त्यासोबतच महापालिकेनेही कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

खाम नदी दुर्गंधीमुक्त राहावी यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे छावणीतूनच काही दिवसांपासून या नदीपात्रात ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे छावणी परिषदेच्या कार्यालयापासून तर गुरुवार बाजारापर्यंतच्या परिसरात पुन्हा खाम नदीतून दुर्गंधी पसरत आहे. छावणीचे ड्रेनेज फुटले असून, ते पाणीही चेट नदीपात्रात दाखल होत आहे.

इको गार्डनमध्ये फुटले ड्रेनेज

छावणीतील जीएसटी कार्यालयामागे महापालिकेने खाम नदी पात्रालगतच इको गार्डन तयार केले आहे. या गार्डनमध्ये नागरिकांची वर्दळही वाढली होती. मात्र या गार्डनमध्ये तयार केलेल्या कमल तलावालगतच छावणीची ड्रेनेजलाईन असून, ही लाईन मे महिन्यापासून फुटली आहे. अजूनही त्याची दुरुस्ती झाली नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. एवढेच नव्हे तर हे पाणीही खाम नदीच्या पात्रात जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT