

Chhatrapati Sambhaji Nagar crime news
छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवरील मैत्रीतून विवाह केलेल्या महिलेला पतीने महिनाभरापूर्वी अॅसिड पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने माफी मागितल्याने महिलेने तक्रार केली नाही. मात्र त्यानंतर सोमवारी (दि.१) सकाळी सातच्या सुमारास जबर मारहाण करून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ढिंबरगल्ली, बेगमपुरा भागात घडली. अमोल भाऊराव दुबे (रा. बेगमपुरा) असे आरोपी पतीचे नाव आहे.
फिर्यादी सुनीता अमोल दुबे (४४, रा. बेगमपुरा) यांच्या तक्रारीनुसार, त्या मार्केटिंगचे काम करून कुटुंबाचा उदर्निवाह करतात. त्यांची आणि अमोलची फेसबुकवर ओळख झाल्यानंतर २० डिसेंबर २०२३ रोजी दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. काही दिवस आनंदात संसार सुरू होता. नंतर अमोल पैशाची मागणी करत दारू पिऊन मारहाण करू लागला. ६ ऑगस्टला त्याने सुनीता यांना अॅसिड पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याने माफी मागितल्याने आणि सासर टिकवण्यासाठी सुनीता यांनी स्वतः अॅसिड पिल्याचा जबाब दिला होता. त्यानंतरही अमोल मारहाण करू लागला.
२७ ऑगस्टला त्याने सुनीता यांना घराबाहेर काढल्याने त्या मानलेला भाऊ अजीज सय्यदच्या घरी राहायला गेल्या होत्या. सोमवारी सकाळी ७ वाजता घरी परत गेल्या तेव्हा अमोलने कुठे गेली होती? असे म्हणत पुन्हा मारहाण सुरू केली. त्यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटून त्या पुन्हा अजीज सय्यदच्या घरी जयसिंगपुरा येथे पळून गेल्या. तेथून बेगमपुरा ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून अमोलविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अमोल देशमुख करत आहेत.