Chhatrapati Sambhajinagar Kannad MLA Satish Chavan
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी आपण महायुतीत आहोत. मात्र राष्ट्रवादी पक्ष हा मुळ विचारापासून दूर गेलेला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीत आम्हाला सन्मानजनक वागणूक मिळाली नाही तर आम्ही स्थानिक पातळीवर युती तोडायला मागेपुढे बघणार नाही असा इशारा आमदार सतिष चव्हाण यांनी महायुतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी (दि.२३) दिला.
शहरातील एका मंगल कार्यालयात माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अध्यक्ष तथा आमदार सतिष चव्हाण यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी सतीश चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी देखील फुटलो होतो पण मी लढलो. शेवटपर्यंत दादांनी कन्नडची जागा सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु नेतेमंडळीना काही अडचणी असतात. पुढची कन्नड विधानसभा राष्ट्रवादी लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे, माजी आमदार नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, शहराध्यक्ष अहेमद भैय्या अली यांची भाषणे झाली. प्रकाश गाडेकर यांनी प्रास्ताविक मुकेश वेताळ यांनी सूत्रसंचालन केले तर विक्रम चव्हाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, तालुकाध्यक्ष प्रकाश गाडेकर, युवक जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे, युवक तालुकाध्यक्ष कल्याण पवार, कृउबा संचालक कैलास अकोलकर, सुरेश डोळस, तातेराव कदम, पाडुरंग घुगे, माजी नगरसेवक संतोष निकम, युवराज बनकर, उध्दव पवार, डाँक्टर र्स असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉ. महेश काचोळे, अॅड. कुष्णा जाधव, दीपक ताठे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी नगरपालिका निवडणूक आपण जिंकणार आहोत. संतोप कोल्हे, आणि नितीन पाटील तुम्ही दोघे एकत्र राहिले तर तालुक्यातील आठ जिल्हा परिपद गट आणि सोळा पंचायत समिती गण आपण जिंकू, असा विश्वास आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला.