छत्रपती संभाजीनगर : मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यासाठी गेलेल्या महापालिका पथकाच्या कारवाईदरम्यान शनिवारी (दि. २८) शालिमार हॉटेल, कटकट गेट ते पोलीस मेस रोड परिसरात नागरिकांमध्ये वाद होऊन दगडफेक व हाणामारीचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण होऊन कारवाईत अडथळा आला. त्यामुळे या भागातील पुढील मोहीम पुरेशा पोलीस बंदोबस्तातच राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मुख्य जलवाहिनीवरून घेतलेल्या अनधिकृत जोडण्यांमुळे नियमित पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ही विशेष मोहीम सुरू आहे. शनिवारी पथक कारवाई करत असताना नागरिकांत आपापसांत वाद होऊन हाणामारी झाली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या कारवाईत पथकप्रमुख रोहित इंगळे, अक्षय डुकले, लाईनमन व नागरी मित्र पथकाचे रतन वाघ, किसन निकम, संतोष बनकर, नारायण फुके, स्वर्णसिंह परदेशी, जनार्दन सांगळे, जयेश मगरे, स्वप्नील पाईकडे, वैभव भटकर, ऋतिक वाघमारे,कुणाल कांबळे, तुषार पोटपिल्लेवार, रितेश परोचा व सागर गायकवाड सहभागी होते.