Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Illegal Murum Mining : गौण खनिज माफियांचा महसूल पथकावर हल्ला

दुचाकी आडवी लावून जेसीबी, हायवा पळवले; चौघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर महामार्गालगत बागतलाव शिवारातील शासकीय गायरान जमिनीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या गौण खनिज पथकावर माफियांनी हल्ला केला. महसूलच्या वाहनाला दुचाकी आडवी लावून जेसीबी व हायवा पळवून लावण्यात आले. तसेच मंडळ अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार ३ नोव्हेंबर रोजी घडला. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख जिलानी शेख रऊफ, शेख नजीर शेख बादशाह (दोघे रा. देवळाई), खुर्शीद मन्नू पटेल आणि त्याचा मुलगा (दोघे रा. गांधेली) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी उस्मानपुरा विभागाचे मंडळ अधिकारी शेखर गोविंदराव शिंदे यांच्या तक्रारीनुसार, बागतलाव शिवारातील शेत गट क्र. २७ मधील शासकीय गायरान जमिनीवर बेकायदेशीर मुरूम उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती ३ नोव्हेंबर रोजी सकाळी महसूल पथकाला मिळाली होती.

त्यानुसार उस्मानपुरा परिसरातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी तेथे दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने मुरुम व मातीचे अवैध उत्खनन करून ५ हायवा गाड्यांद्वारे वाहतूक केली जात होती.

पथकाने वाहने अडवण्याचा प्रयत्न केला असता शेख जिलानी आणि शेख नजीर यांनी आपली दुचाकी महसूल पथकाच्या वाहनासमोर आडवी लावून पाचही हायवा आणि दोन्ही जेसीबी पळवून लावण्यास मदत केली.

तुला सस्पेंड करून बदली करेन म्हणत धमकी

काही वेळातच आरोपी खुर्शीद पटेल व त्याचा मुलगा दुचाकीवरून आले. खुर्शीदने थेट मंडळ अधिकारी शिंदे यांची कॉलर पकडून मारहाण केली. तुमची औकात आहे का आमच्या गाड्या पकडायची, तुला निलंबित करून बदली करेन, असा दम भरत शिवीगाळ केली. कर्मचाऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता आरोपींनी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, घटनास्थळाची पाहणी केली असता शासकीय गायरान जमिनीतून अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीचा २०० ब्रास मुरुम उकरून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. महसूल पथकाने जागेचा सविस्तर पंचनामा केला असून, पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनात हवालदार अनिल पवार पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT