हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर येथे मटका व्यवसायावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करत मोठी धाड टाकली. या कारवाईत ‘मटका किंग’ म्हणून ओळखले जाणारे शेख रफिक शेख रशिद व इरफान खान मुकतार खान यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाई ४५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध मटका व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे, पोहेकॉ कैलास निंभोरकर, पोलीस अंमलदार शीतल बारगळ यांनी स्थानिक पोलीस कैलास करवंदे, शिवदास बोराडे यांच्या मदतीने १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हतनूर येथील बसस्थानका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज कमानी जवळील गणेश पवार यांच्या गाळयात धाड टाकण्यात आली.
या धाडीत शरद पांडुरंग शहरवाले, रविंद्र कारभारी जाधव हे कल्याण व मिलन मटका खेळतांना आढळून आले. चौकशीदरम्यान शेख रफिक शेख रशिद व इरफान खान मुकतार खान हे कमिशनवर मटका खेळवित असल्याचे सांगितले आणि जमा झालेली रक्कम शेख रफिक शेख रशिद व इरफान खान मुकतार खान यांच्याकडे देत असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर आरोपींवर कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.