Hatnur Highway Road Accident Pudahri
छत्रपती संभाजीनगर

Hatnur Accident | हतनूर महामार्गावर दुचाकी दुभाजकाला धडकली; वाढदिवशी तरुणावर काळाचा घाला

हतनूर गावावर शोककळा, पाच महिन्यांपासून उड्डाणपुलावरील पथदिवे बंद; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताला निमंत्रण?

पुढारी वृत्तसेवा

Hatnur Highway Road Accident

कन्नड : हतनूर येथील राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा परिषद शाळेजवळ उड्डाणपुलाच्या सुरुवातीला दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात साईराज योगेश बिडवे (वय २०) या महाविद्यालयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ७) रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली.

विशेष म्हणजे, ७ ऑगस्ट रोजीच साईराजचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आनंदाला दुसऱ्याच दिवशी झालेल्या या दुर्घटनेने गालबोट लागले असून, बिडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हतनूरसह पंचक्रोशीत या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

साईराज हा कन्नडहून दुचाकीवरून हतनूरकडे येत होता. रात्रीच्या वेळी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी थेट दुभाजकाला धडकली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रस्त्यावर कोसळला.

अपघाताची माहिती मिळताच नातेवाइक आणि मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील साईराजला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

अंत्यसंस्कारावेळी हळहळ

साईराजवर ८ ऑगस्ट रोजी हतनूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. साईराज महाविद्यालयीन शिक्षणाच्या द्वितीय वर्षात शिकत होता. सामाजिक कार्यकर्ते योगेश पांडुरंग बिडवे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, आजी आणि एक बहीण असा परिवार आहे.

पथदिवे सुरू असते तर...!

हतनूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरील पथदिवे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण उड्डाणपूल आणि परिसर अंधारात बुडालेला असतो. उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा अंदाज वाहनचालकांना अंधारामुळे येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT