छत्रपती संभाजीनगर : हर्सूल येथील खुल्या कारागृहातून 8 फेबुवारी रोजी पसार झालेला जन्मठेपेचा कैदी आणि कुख्यात बबलाचा भाऊ शेख अमजद ऊर्फ असद शेख मोसीन (35, रा. सलीम शहा कॉलनी, जटवाडा रोड) याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.31) अटक केली. गेल्या दोन महिन्यांपासून तो ओळख लपवून खुलताबाद येथील कबस्तानात काम करून राहत होता.
अधिक माहितीनुसार, बबला, शेख अमजद आणि त्याच्या टोळीने 16 मे 2018 रोजी प्लॉटिंगच्या वादातून प्लंबर शेख जब्बार याचे अपहरण केले होते. जब्बारला तब्बल चार तास मरणयातना देऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. क्रौर्याची सीमा ओलांडत आरोपींनी त्याचे शरीर फाडून अवयव बाहेर काढले आणि त्यात दगड भरून मृतदेह दौलताबाद येथील विहिरीत फेकला होता.
या खळबळजनक प्रकरणात 12 फेबुवारी 2020 रोजी अमजदसह त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. जुलै 2024 मध्ये अमजदची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली होती. काही दिवसांनी हर्सूल येथील खुल्या कारागृहातून तो पसार झाला होता. तो खुलताबादमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांना दिली.
या माहितीच्या आधारे पथकाने अमजदला बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस अंमलदार प्रदीप दंडवते, विजय निकम, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, संतोष चौरे यांच्या पथकाने केली.
सासुरवाडीतून कबस्तानात आश्रय
चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला खुल्या कारागृहात ठेवले होते. मात्र, तिथे एका कैद्याशी त्याचा वाद झाला. या वादामुळे पुन्हा बंदिस्त कारागृहात टाकले जाईल, या भीतीने त्याने 8 फेबुवारी रोजी तिथून पलायन केले. कारागृहातून पळाल्यावर तो सुरुवातीला सासरवाडीला (सिल्लोड) गेला, मात्र तिथे धोका वाटू लागल्याने त्याने खुलताबाद गाठले आणि तिथल्या कबस्तानात काम करत होता.