पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन देताना पदाधिकारी व गणेशभक्त. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची अरेरावी, लाठीचार्ज केल्याचा आरोप

सखोल चौकशी करू, व्हिडीओ असतील द्यावे, पोलिस आयुक्तांचे शिष्टमंडळाला आवाहन

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलमंडी परिसरात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २८) सकल हिंदू समाज आणि प्रमुख गणेश मंडळांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पोलिस आयुक्तांनी परिमंडळ-१ चे उपायुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांना तातडीने बोलावून घेत शिष्टमंडळासोबत चर्चा केली.

पोलिसांच्या बॉडी कॅमेऱ्यात लाठीमार केल्याचे कुठेही दिसत नाही. तरीदेखील तुमच्याकडे यासंदर्भात काही फोटो किंवा व्हिडिओ असल्यास ते द्यावेत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी नगरसेवक सचिन खैरे नगरसेवक, जुगलकिशोर वर्मा, किशोर तुळशीबागवाले, लक्ष्मीनारायण बाखरीये, सुरेश टाक, गोपी घोडेले, प्रमोद शिंदे, राजेश व्यास, चेतन जांगडे, प्रीतेश जयस्वाल, रेवन सोनवणे, मुकेश चौधरी, अजय परदेसी, राजन कोरटकर, महेश घोगंते, निखिल जाधव, अजय शेवाळे, सुधीर घाडगे, अविनाश चव्हाण, तुषार सोनवणे, अभिषेक सोनवणे, गणेश करगळे, संदेश डोंगरे आदींसह गणेशभक्त उपस्थित होते.

निवेदनात नमूद केल्यानुसार, यंदा डीजेवर बंदी असल्याने सर्व मंडळांनी पारंपारिक ढोल आणि लेझीम पथकांसह अत्यंत शिस्तीत मिरवणूक काढली होती. मात्र, पोलिसांनी इतिहासात पहिल्यांदाच मंडळांना घाईघाईने पुढे जाण्यास भाग पाडले. गुलाल उधळण्यावरून कार्यकर्त्यांना वारंवार रोखण्यात आले.

एका वाहनावरील मोठी गणेशमूर्ती पाहून काही पोलिस कर्मचाऱ्यांनी गलिच्छ भाषा वापरत दडपशाही केली. तसेच, वाहनांवरील फोकस लाईट बंद करण्यासाठी थेट लाईटवरच लाठ्या मारून ते फोडण्यात आले, ज्यामुळे ढोल पथकातील महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नियमानुसार रात्री १२ वाजता सर्व वाद्ये बंद करून मंडळे शिस्तीने विसर्जन विहिरीकडे मार्गस्थ होत होती.

मुख्य गुलमंडी चौकात रात्री १२ वाजता वाद्ये बंद झाल्यानंतर भाविकांनी केवळ मूर्तीवर गुलाल आणि फुलांची उधळण केली. मात्र, पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर थेट लाठीमार केला तसेच शोभेचे फवारे आणि गुलाल उडवणारी यंत्रे जप्त करून तोडफोड केल्याचेही निवेदनात नमूद आहे.

एक गट नाराज, तर महासंघाकडून पोलिसांचे कौतुक

गुलमंडीवरील घटनेवरून एकीकडे सकल हिंदू समाज आणि काही गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, यंदाचे अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे व इतर सदस्यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत पोलिस दलाचे आभार मानले आणि विसर्जन मिरवणुकीतील नियोजनाचे कौतुक केले. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांमध्येही दोन गट पडल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

बॉडी कॅमेऱ्यात लाठीमार दिसत नाही, तरीही चौकशी करू - सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत फटाके वापरण्यास मनाई होती, पोलिसांनी केवळ फटाके फोडण्यापासून रोखले. आम्ही संबंधित पोलिसांचे बॉडी कॅमेरे तपासले असून, त्यात कुठेही लाठीमार केल्याचे दिसून येत नाही. घटनास्थळी स्वतः पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर उपस्थित होते. तरीदेखील मंडळांच्या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी केली जाईल.
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT