Chhatrapati Sambhajinagar Guardian Minister Sanjay Shirsat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पूवी सरकारी नोकरीत थोडाफार वशिला चालायला. तेव्हा मी माझ्या भावाला नोकरीला लावले. पण तो पुढच्या सहा महिन्यांतच मला विसरला, अशी खंत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. तुमचे तसे होऊ देऊ नका, तुम्हाला नोकरी लागली आहे, आता कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा, असे आवाहनही त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना केले.
जिल्ह्यात अनुकंपा तत्त्वारील (गट क व गट ड) तसेच सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या ३०३ उमेदवारांना शनिवारी समारंभपूर्वक नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या समारंभात पालकमंत्री संजय शिरसाट बोलत होते. व्यासपीठावर आ. अनुराधा चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदी उपस्थित होते.
नवनियुक्त उमेदवारांशी संवाद साधताना पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, शासनाने अवलंबिलेल्या नव्या कार्यपद्धती व नियमांमध्ये सुधारणा केल्याने आज अनेकांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा प्रश्न निकाली निघाला आहे. प्रत्येक नोकरीधारकावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. अनुकंपा तत्त्वावर ज्यांना नियुक्ती मिळाली आहे, त्यांनी आपले कुटुंब, आपल्यावर अवलंबून असणारे यांची काळजी घ्यावी असे शिरसाट म्हणाले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी तर सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.
वडिलांनी ६७ हजारांची पुंजी स्वाधीन केली
पालकमंत्री शिरसाट यांनी यावेळी त्यांच्या वडिलांचा आणि भावाचाही किस्सा सांगितला. माझे वडील एसटीत कार्यरत होते. सेवानिवृत्तीच्या दिवशी वडिलांनी गाठोडे घेऊन घरी आले. त्यात त्यांना मिळालेली ६७हजारांची पुंजी होती. आतापर्यंत मी तुम्हाला सांभाळले, आता तुम्हाला मला सांभाळायचे आहे, असे म्हणून त्यांनी ती पुंजी आमच्या स्वाधीन केली. हा भावनिक करणारा क्षण होता, असे शिरसाट म्हणाले.
नोकरी लागली म्हणून तुम्ही कुटुंबाला विसरू नका, असा सल्ला नवनियुक्त उमेदवारांना देऊन शिरसाट म्हणाले, आता सरकारी नोकरीत वशिला चालत नाही. पण पूवी तसे नव्हते. थोडाफार वशिला चालायचा. त्यामुळे मी माझ्या भावाला नोकरीला लावले. पहिल्या महिन्यात त्याने त्याचा पूर्ण पगार मला आणून दिला. पण पुढे सहा महिन्यांतच तो मला विसरला. तसे तुमचे होऊ देऊ नका, कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा, हवेत जाऊ नका, चुकीच्या मागीने पैसे जमविण्याच्या फंद्यात पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.