इयत्ता पाचवीच्या शाळकरी मुलीचा पाठलाग करत आरोपीने अश्लील हातवारे व दांड्याने मारण्याची धमकी दिली.
मुलींनी आरडाओरड केल्यावर जमलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला.
आरोपी अशोक यशवंत साळवे (३५, रा. हिंदलाईन, उल्हास नगर) याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली.
प्रकरणात गुन्हा नोंदवून हेडकॉन्स्टेबल मंदा सामसे अधिक तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शाळकरी मुलीचा पाठलाग करत तिला अश्लील हातवारे करून दांड्याने मारण्याची एकाने धमकी दिली. हा प्रकार भररस्त्यात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सुरू होता. घाबरलेल्या मुलीसह तिच्या मित्र-मैत्रिणीने आरडाओरड करताच जमलेल्या नागरिकांनी त्यास पकडून चोप दिला.
ही घटना मंगळवारी (दि.९) उत्सव चौक ते दशमेश नगर रस्त्यावर घडली. अशोक यशवंत साळवे (३५, रा. हिंदलाईन, उल्हास नगर, सध्या रा. गाडे चौक) यास अटक केल्याची माहिती उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली. श्रेय नगर भागातील इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी मुलगी तिच्या मित्र-मैत्रिणीच्या सोबत घरी परतत होती.
या मुलांच्या घोळक्याच्या पाठीमागेच एक व्यक्ती बराच वेळ चालत होता. त्याने मुलींकडे बघून अश्लील हातवारे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलाना घाबरलेले पाहून त्याची हिंमत अधिक वाढली. त्याने लागलीच शिवीगाळ करण्यास सुरुवात करून तुम्हाला लाकडी दांड्याने मारहाण करण्याची धमकी दिली.
यामुळे काही मुले रडायला लागली तर काहींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जमलेल्या नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप देत आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल मंदा सामसे करत आहेत.