Chhatrapati Sambhajinagar Farmer Death
चापानेर : चापानेर येथील गोकुळ कारभारी भाडाईत (वय ३९) या युवा शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी घरात कोणीही नसताना गोकुळ भाडाईत यांनी राहत्या घरातील लोखंडी येगळीला साडी बांधून गळफास घेतला. दरम्यान, त्यांची पत्नी अचानक घरी आल्यानंतर हा प्रकार तिच्या निदर्शनास आला. पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहताच तिने आरडाओरडा केला. आवाज ऐकून गल्लीतील नागरिकांनी तातडीने धाव घेत गोकुळ यांना खाली उतरवून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.
गोकुळ भाडाईत यांच्यावर संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. त्यांच्या कुटुंबावर विविध बँका आणि वित्तीय संस्थांचे कर्ज होते. वडिलांच्या नावावर सोसायटीचे ४१ हजार ४९४ रुपये मुद्दल व १ हजार २४० रुपये व्याज, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कन्नड शाखेचे १ लाख ५० हजार रुपये, तसेच मायक्रो फायनान्स, ग्रामीण कुट्टा, बंधन बँक आणि लोकविकास बँकेचे वाहन कर्ज अशी विविध देणी असल्याची माहिती समोर आली आहे.
चालू हंगामात गट क्रमांक ३४४ व ३४५ मधील एकूण ८५ आर क्षेत्रावर त्यांनी मका आणि कपाशीची लागवड केली होती. सुरुवातीला पीक जेमतेम असतानाच पावसाने दडी मारली. पाण्याअभावी उभी पिके करपून गेली. त्यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा मावळली. एकीकडे शेतीतील नुकसान, तर दुसरीकडे कर्जाचा वाढता बोजा अशा प्रतिकूल परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागत होते.
गोकुळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि वडील असा परिवार आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दहा महिन्यांपूर्वी त्यांचे भाऊ शेखर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. आता एका वर्षाच्या आत आई-वडिलांनी दोन मुलांना गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.