छत्रपती संभाजीनगर : तरुणाने कुटुंबासमक्ष लग्नाची मागणी घालत रीतसर साखरपुडा केला. मात्र, त्यानंतर घरी कुणीही नसताना लग्नाचे खोटे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केले आणि शेवटी लग्नास नकार देऊन तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात रविवारी (दि.३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिकनगर भागात राहणाऱ्या २३ वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपीने ७ जुलै रोजी सायंकाळी कुटुंबासमक्ष पीडितेच्या वडिलांकडे 'मला तुमची मुलगी पसंत आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे' अशी मागणी घातली. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा साखरपुडा पार पडला आणि दिवाळीनंतर लग्न करण्याचे निश्चित झाले. यानंतर आरोपीने तिला सतत फोन करणे सुरू केले.
१२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राजूने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिला असता, "मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे, तू काळजी करू नकोस," असे खोटे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा येऊन त्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पीडितेने लझाबाबत विचारणा सुरू केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ सुरू केली. त्याने तिचे फोन घेणेही बंद केले. काही दिवसांनी तिने पुन्हा त्याला जाब विचारला असता, "मला तुझ्यासोबत लग्न करायचे नाही. मला परत फोन केल्यास तुला सोडणार नाही," अशी धमकी दिली. अखेर पीडितेने पुंडलिकनगर ठाणे गाठून तक्रार दिली. पुढील तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक काळे करत आहेत.