Sambhajinagar Earthquake : शहरात भूकंप ? प्रशासनाची धावाधाव... File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Earthquake : शहरात भूकंप ? प्रशासनाची धावाधाव...

मंत्रालयातून फोनाफोनी, नोंद मात्र कुठेच नाही, आता अफवेच्या केंद्रबिंदूचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Earthquake in the city? Administration rushing

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गणेश कॉलनी, रशीदपुरा, टीव्ही सेंटर आदी भागांत दुपारी भूकंपाचे धक्के बसल्याची चर्चा सुरू झाली. अगदी मंत्रालयस्तरापर्यंत ही बातमी पोहचली. त्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली. मात्र, जिल्ह्यात कुठेही भूकंप झाला नसल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले. आता या अफवेचा केंद्रबिंदू कोणता याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.

शहरातील काही भागांत नागरिकांना अचानक धक्के जाणवले. त्यातील काही जणांनी भूकंप झाल्याचा अंदाज बांधला. पाहता पाहता ही चर्चा सर्वत्र पसरली. सायंकाळी मंत्रालयातून फोनद्वारे यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला विचारणा करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले. सर्वत्र विचारपूस सुरू झाली. केंद्र सरकारच्या भूकंप अॅपवरून माहिती घेण्यात आली. मात्र, तिथे कोणतीही नोंद

आढळून आली नाही. त्यानंतर नाशिक येथील महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) कडून माहिती घेण्यात आली. त्यांच्याकडून भूकंपाच्या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. जिल्हा प्रशासनाने जलसंपदासह इतरही विविध शासकीय यंत्रणांकडून भूकंपाबाबत खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु जिल्ह्यात कुठेही भूकंप झाल्यची नोंद आढळून आली नाही.

त्यामुळे ही अफवाच असल्याचे सायंकाळी उशिरा स्पष्ट झाले. दरम्यान, भूकंपाची ही अफवा कुठून पसरली याचा शोध आता प्रशासनाकडून घेतला जात आहे. भूकंपाच्या अफवेचा केंद्रबिंदू कोणता हे प्रशासनाकडून शोधले जात आहे. एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी देखील भूकंप झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला, नांदेड येथील यंत्रणेकडून माहिती तपासून पाहिली परंतु तिथे कोणतीही नोंद नसल्याचे त्यांनी नमूद केले.

जायकवाडीवरील भूकंप मोजणी यंत्रणा बंद

जिल्ह्यात पैठण येथील जायकवाडी धरणावर भूकंप मोजण्याची यंत्रणा कार्यान्वित होती. परंतु ही यंत्रणा पाच सहा वर्षांपूर्वीच बंद पडली. त्यामुळे शनिवारच्या भूकंपाबाबत या ठिकाणी कोणतीही पुष्टी होऊ शकली नाही. दरम्यान, जायकवाडी धरणावर आता नाशिकच्या मेरी संस्थेकडून नवीन भूकंप मापक यंत्र बसविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

भूकंपाचे धक्के जाणवल्याची चर्चा आमच्यापर्यंत आली होती. आम्ही सर्व ठिकाणांहून त्यावावत माहिती घेतली. परंतु जिल्ह्यात कुठेही भूकंप झाल्याचे वृत्त नाही, ती निव्वळ अफवा होती.
जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT