छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयात प्रॅक्टिकल परीक्षा देऊन उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगवत घरी पर-तणाऱ्या २० वर्षीय तरुणावर काळाने अचानक झडप घातली. महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या हायवा (डंपर) चालकाने ओमकार रायभान खनसे (२०, रा. बजाजनगर) या विद्यार्थ्यांच्या मोपेडला धडक देऊन चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (दि.१) सकाळी पावणेबाराच्या सुमारास मिल कॉर्नर ते लिटल फ्लॉवर स्कूल रस्त्यावरील लक्ष्मी कॉलनी चौकात घडली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, खनसे कुटुंब मूळचे पैठण तालुक्यातील दिनापूर येथील असून ते शहरात एकत्र राहतात. ओमकार हा एस. बी. महाविद्यालयात बीबीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी त्याचे महत्त्वाचे प्रॅक्टिकल असल्याने तो सकाळी उत्साहात घराबाहेर पडला. परीक्षा आटोपून तो त्याच्या मोपेड (एमएच-२०- एफडब्ल्यू २००१) घराकडे परतत होता. याच वेळी समोरून भरधाव आलेल्या रेड्डी कंपनीच्या कचरा उचलणाऱ्या डंपरने (एमएच २० ईएल ००७९) त्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ओमकार थेट चाकाखाली आल्याने त्याचा जागीच अंत झाला.
कुटुंबीयांना धक्का; वडील रुग्णालयात दाखल
ओमकार कुटुंबाचा लाडका होता. त्याच्या मृत्यूची बातमी आई-वडिलांना सहन होणार नाही, म्हणून नातेवाइकांनी लपवून ठेवली. मुलाचा अपघात झाला असून, तो जखमी आहे, असेच त्यांना सांगण्यात आले. मात्र शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यविधीच्या तासाभरापूर्वी सत्य उघड करण्यात आले. आपला लाडका लेक कायमचा हिरावल्याचे समजताच वडिलांना तीव्र धक्का बसला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओमकारच्या पश्चात लहान भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
काका घरीच वाट पाहत राहिले
सध्या शेतात गहू सोंगणीचे काम सुरू असल्याने, प्रॅक्टिकल संपल्यानंतर ओमकार काकांसोबत गावी जाणार होता. त्याचे काका त्याची वाटच पाहत होते, मात्र तो घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.
चालकावर गुन्हा दाखल
याप्रकरणी ओमकारचा चुलत भाऊ रोहित दादासाहेब खनसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी डंपर चालक शेख जमील शेख नासेर (३८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली.
मनपाच्या बेफाम वाहनांना लगाम घालण्याची गरज
शहरात महापालिकेच्या आणि कंत्राटी कंपन्यांच्या कचरा वाहतूक करणारी वाहने अतिवेगात धावताना दिसतात. कचऱ्याच्या फेऱ्या पूर्ण करण्याच्या नादात मनपाचे डंपर अरुंद रस्त्यावरही सुसाट जातात. यापूर्वी मनपाचे कचरा उचलणारी वाहने, पाण्याच्या टँकरमुळे लहान-मोठे अपघात घडले आहेत. तर काही जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे प्रशासनाने या बेफाम वाहनांना लगाम घालवण्याची गरज आहे.