छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके उडवून आतषबाजी केल्याने रविवारी शहराच्या प्रदूषणात दुपटीने वाढ झाली. जागोजागी फटाक्यांचा धूर, वातावरणातील धुरके यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली. साधारण रोज ७० ते १०० दरम्यान असणारा हवेचा गुणवत्ता निर्देशांक रविवारी २०० च्या वर गेल्याने अनेकांचा श्वास अक्षरशः गुदमरला आहे. त्यामुळे शहरात वायू प्रदूषणामुळे अॅलर्जी, सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि कानदुखीच्या त्रासाने हजारो रुग्णांना बेजार केले.
उद्योगनगरी म्हणजेच औद्योगिक वसाहतींत अनेक मोठ्या कंपन्या, कारखाने असूनही छत्रपती संभाजीनगरातील एआयक्यू (एअर क्वालिटी इंडेक्स) साधारण ७० ते १०० च्या दरम्यान असते. हवेची चांगली गुणवत्ता असणाऱ्या देशातील पहिल्या १४ ते १५ शहरांमध्ये संभाजीनगराचा समावेश होतो. मात्र, दरवर्षी दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरात वायू प्रदूषणात मोठी वाढ होते.
यंदा रविवारी दिवाळी निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने हवेची गुणवत्ता ढासळली. त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक २००च्या वर पोहचला. ध्वनिप्रदूषणातही मोठी वाढ झाली. धुरामुळे हवेच्या गुणवत्तेची पातळी अत्यंत, खराब झाल्याचे आढळून आले. हवेचा दर्जा निर्देशांक १०० च्या खाली असणे आवश्यक आहे.
संभाजीनगरात अनेक कंपन्या, मोठे उद्योग असूनही एक्यूआय ९० ते १०० दरम्यान असतो. दिवाळीत मात्र, कंपन्या बंद असूनही केवळ फटाक्यांमुळे प्रदुषणात वाढ होऊन एक्यूआय दुपटीने वाढतो. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारी ओळखून पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष द्यावे. पुढच्या पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी हवेची गुणवत्तात टिकून ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
उच्च धुराच्या फटाक्यामुळे वाढले प्रदूषण
यंदा दिवाळीला कमी धूर असणारे पर्यावरणपूरक फटाकेही बाजारात आले होते. मात्र, त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उलट उच्च उच्च धूर असलेल्या फटाक्यांचा अधिक वापरामुळे हवेच्या प्रदूष-णातही प्रचंड वाढ झाली. फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम झाला आहे.
कुठल्या भागात किती प्रदूषण
दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली. चिकलठाणा येथील प्रदूषण नियमंण केंद्रावरील एक्यूआय तब्बल १९५वर पोहचला. तर औद्योगिक वसाहतीमध्ये म्हणजे वाळूज येथील मोरे चौकातील एक्यूआय तब्बल २२८ पर्यंत वाढला होता. शहरातील रचनाकार कॉलनी केंद्रावर एक्यूआय २०९ पर्यंत पोहचला.