छत्रपती संभाजीनगर : जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदासाठी शुक्रवारी (दि.५) शेवटच्या दिवशीपर्यंत एकूण २१४ अर्ज दाखल झाले. यात पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे यांच्यासह खासदार कल्याण काळे आणि जिल्ह्यातील पाच आमदार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तसेच आ. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर आणि पालकमंत्री शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत चांगलेच वातावरण तापणार आहे.
जिल्हा बँकेच्या एकूण २१ संचालक निवडीसाठी ४ जुलै रोजी मतदान आणि ५ जुलैला मतमोजणी होईल. तत्पूर्वी यासाठी १ जूनपासून जिल्हा बँक कार्यालयातच अर्ज वाटप व अर्ज दाखलची प्रक्रिया पार पडली. दुसऱ्या दिवशी कन्नडच्या आ. संजना जाचव, आ. सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर, बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे यांनी अर्ज दाखल केले.
तर गुरुवारी मंत्री अतुल सावे, भाजपा शहराध्यक्ष किशोर शितोळे, राजू शिंदे, दिनेशसिंह परदेशी, रामराव शेळके, जगन्नाथ काळे यांच्यासह ७७जणांचा समावेश आहे. शुक्रवारी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली.
सकाळी उबाठाचे नेते आ. अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पालकमंत्री संजय शिरसाट, खा. कल्याण काळे, आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे, आ. अनुराधा चव्हाण, नगरसेविका हर्षदा शिरसाट आणि विधान परिषद भाजपाचे उमेदवार सुहास सिरसाठ यांनी तसेच याच निवडणुकीत ऐनवेळी माधार घेतलेल्या उबाठाच्या उमेदवार देवयानी पाटील यांनीही नामनिर्देशन दाखल केले आहे. तर पैठण येथून प्राथमिक वि.का.स. मधून आमदार विलास भुमरे यांचेच दोन अर्ज दाखल झाले आहे.
शेवटच्या दिवशी १३७ अर्ज दाखल
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दिवसभरात १३७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. पहिल्या दिवशी निरंक, दुसन्या दिवशी १० आणि तिसऱ्या दिवशी ६७ अर्ज दाखल झाले. असे एकूण २१४ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी दिली. यात अनेक उमेदवारांनी २ ते ३ अर्ज दाखल केलेले आहेत. ८ जूनला अर्जाची छाननी होणार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंनी टोचले कान
दोन्ही आजी-माजी पालकमंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्यांनी मुंबई येथे बैठक घेत या दोन्ही नेत्यांचे कान टोचले. शिंदेंनी सक्त सूचना केल्याचे शिरसाटही म्हणाले. शुक्रवारी हे दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास केल्याने त्यांच्यातील वादावर पडदा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सेना-भाजप नेत्यांचे एकत्र येऊन अर्ज
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दुपारी भाजपचे मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष किशोर शितोळे, विधान परिषदेचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी, तर शिंदे सेनेकडून खा. संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल यांनी एकत्र येत महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. यात प्रामुख्याने आ. अनुराधा चव्हाण, आ. विलास घुमरे यांचे अर्ज दाखल केले. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आ. अंबादास दानवे यांनी त्यांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
दोघांचाही एकाच गाडीतून प्रवास, यापुढे एकसंघ काम करण्याची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि आ. अब्दुल सत्तार यांच्यातील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला वाद अखेर शुक्रवारी (दि.५) मिटल्याचे समोर आले. अलीकडेच या दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा उफाळून आला होता. मात्र जिल्हा बँक निवडणुकीनिमित्त या दोन्ही आजी-माजी पालकमंत्र्यांनी एकाच वाहनातून प्रवास करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. आमच्यातील वाद मिटला असून, यापुढे आम्ही एकत्र काम करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. यावेळी खासदार संदीपान भुमरेही उपस्थित होते. ते आमचे हेडमास्तर असल्याचे सत्तार म्हणाले.
गेल्या दोन वर्षांपासून मंत्री शिरसाट आणि आ. सत्तार यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू होता. मात्र वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर दोघांमधील वाद शमला होता. मात्र सिल्लोड येथील मेळाव्यातून सत्तार यांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साचल्याने हा वाद पुन्हा उफाळून आला होता. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळाली.
दोन्ही नेत्यांनी पक्षातील नाराजी, उमेदवारी आणि स्थानिक राजकारणावरून एकमेकांवर सडकून टीका केली होती. मात्र शुक्रवारी जिल्हा बैंक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सत्तार हे शिरसाट यांच्या गाडीतून आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. कारमधून उतरताच सत्तार यांनी माध्यमांना सांगितले की, आमच्यात मतभेद होते, पण मनभेद नाहीत. तर शिरसाट म्हणाले जिल्हयातील सहा आमदार आणि खासदार एकजुटीने काम करणार असून, कुठलाही वाद नाही. दरम्यान, संजय शिरसाट यांचे सूचक आ. अब्दुल सत्तार आहेत, हे विशेष.