Ayush Hospital  Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar AYUSH hospital|जागेच्या वादात अडकले जिल्हा आयुष रुग्णालय

Chhatrapati Sambhajinagar District AYUSH hospital land controversy - तिढा सुटताच उभारणीच्या कामाला गती : आयुष राज्यमंत्री

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील प्रस्तावित आयुष रुग्णालयाच्या जागेचा वाद अद्याप कायम असून, हा तिढा सुटल्यानंतर रुग्णालय उभारणीच्या कामाला गती मिळेल, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी (दि.३) माध्यमांशी बोलताना दिली.

केंद्र सरकारने यासंदर्भात राज्य सरकारला कळविले असून, त्यानुसार राज्य सरकारकडून जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. येथील एमजीएम विद्यापीठाच्या रुख्मिणी हॉल येथे जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मसी सप्ताहनिमित्ताने राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर राज्यमंत्री जाधव यांनी आयुष रुग्णालयासह देशातील आयुर्वेद संस्थानांच्या विस्ताराबाबत माहिती दिली.

देशात सध्या दिल्ली आणि गोवा येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान सुरू आहेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणखी तीन नवीन संस्थानांची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी तिसऱ्या संस्थेसाठी देशातील विविध राज्यांकडून २२ प्रस्ताव प्राप्त झाले असून, महाराष्ट्रासह संबंधित राज्यांचे प्रेझेंटेशन पूर्ण झाले आहे. मात्र, अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

देशभरात एकूण १० अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान उभारण्याचे उद्दिष्ट असून, यावर्षी तीन आणि पुढील टप्प्यात आणखी सात संस्थानांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. यामुळे आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि प्रगत आरोग्यसेवेला चालना मिळणार आहे.

गंभीर आरोग्य समस्यांवर नियंत्रणाचे प्रयत्न

मानसिक तणाव, हृदयविकार, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आयुष विभाग प्रयत्नशील आहे. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि विस्कळीत दिनचर्या यांचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने आहार व दिनचर्येवर विशेष भर दिला जात आहे. पारंपरिक उपचार पद्धतींसोबत संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय साधण्याचे केंद्र सरकारचे धोरण असल्याचेही राज्यमंत्री जाधव यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT