Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar cyber crime : बालशोषणाचे व्हिडिओ विकणारे दोन विद्यार्थी गजाआड

दोघेही बी. कॉम.चे विद्यार्थी; दीड वर्षापासून गोरखधंदा; ३ हजारांहून अधिक व्हिडिओ

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून बालकांसंबंधित लैंगिक शोषणाचे अश्लील व आक्षेपार्ह डिजिटल सामग्रीची विक्री करणाऱ्या बी.कॉम. च्या दोन तरुण विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गेल्या दीड वर्षापासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ (२१, रा. सुभाषचंद्र बोसनगर, टीव्हीसेंटर, हडको) आणि शुभम (२०, रा. पाथरीकर नगर, हडको) अशी आरोपींची नावे आहेत.

बालकांच्या लैंगिक शोषणाच्या व्हिडिओचा संग्रह करणाऱ्या भावसिंगपुरा भागातील अक्षय या फार्मसीच्या विद्यार्थ्याला चार दिवसांपूर्वीच सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याकडे तब्बल ४९० व्हिडिओ आढळून आले होते. स्मार्टफोन आणि सहज उपलब्ध असलेल्या इंटरनेटमुळे काही तरुण अश्लील व्हिडिओंच्या भयानक दलदलीत ओढली जात असल्याचे भीषण वास्तव या लागोपाठच्या घटनांमधून समोर आले आहे.

सायबर पोलिसांनी दुसऱ्या एका गुन्ह्यात पार्थ कुलकर्णी आणि शुभम लोहाडे या बी. कॉम. च्या दोन विद्यार्थ्यांना व्हिडिओ विक्री करण्याच्या प्रकरणात गजाआड केले. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन आणि टॅब जप्त केले आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, हवालदार योगेश तळवंदे, अमोल सोनटक्के, कांबळे, संतोष गायकवाड, ज्योती भोरे, हर्षा मेहता आणि माला सलामपुरे यांच्या पथकाने केली.

क्लाउडवर ३,०४१ व्हिडिओ डिलिट, पण...

पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच आरोपींनी त्यांच्या क्लाऊडवर सेव्ह केलेले व्हिडिओ डिलिट केले होते. मात्र सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणात त्यांच्याकडे तब्बल ३,०४१ अश्लील व्हिडिओ असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सुमारे २०० बालकांच्या लैंगिक शोषणाचे व इतर आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले आहेत. डिलिट केलेले उर्वरित व्हिडिओ फॉरेन्सिक विभागामार्फत रिकव्हर करण्यात येणार आहेत.

एक व्हिडिओ १०० ते ४९९ रुपयांपर्यंत विक्री

आरोपींनी टेलिग्रामवर चॅटिंग, डेटिंग, ऑनलाईन मीट आणि पॉर्न यासारख्या वेगवेगळ्या ग्रुप्सवर जॉईन होऊन विक्रीचा धंदा थाटला होता. ते बालकांच्या लैंगिक शोषणाचे आणि पॉर्न व्हिडिओ १०० रुपयांपासून ते ४९९ व त्याहून अधिक किमतीत विकत असत, तर काही छायाचित्रे अवघ्या ५ रुपयांना विकल्याचे समोर आले आहे. पार्थ हा टेलिग्रामवर खाती चालवून ही सामग्री विकत होता, तर शुभम या विक्रीतून मिळणारी रक्कम स्वतःच्या बँक खात्यामध्ये स्वीकारत होता.

कौटुंबिक परिस्थिती हलाखीची

पार्थ कुलकर्णी आणि शुभम लोहाडे हे दोघेही बी. कॉम. च्या द्वितीय वर्षात शिकतात. पार्थ लहान असतानाच (दोन वर्षांचा असताना) त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, तर शुभमचे वडील शाळेतून लिपिक म्हणून निवृत्त झाले आहेत. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची असताना दोघेही या दलदलीत कसे अडकले, हा प्रश्न कायम आहे.

विकृत मानसिकतेतून अत्याचाराचा धोका !- 66 बालकांचे लैंगिक शोषण करणारी किंवा इतर विकृत आक्षेपार्ह सामग्री सतत पाहिल्यामुळे मानसिक स्थिती झपाट्याने ढासळते. सद्सद्विवेकबुद्धी नष्ट होऊन विचारसरणीला विकृतीचा विळखा पडतो. या विकृत मानसिकतेतूनच लैंगिक अत्याचारासारखे अत्यंत गंभीर आणि अमानुष गुन्हे घडण्याची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवावे, आवश्यकता वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. जितेंद्र डोंगरे, मनोसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT