छत्रपती संभाजीनगर : सातारा-देवळाई ग्रामपंचायत विसर्जीत करून संपूर्ण परिसर २०१६ साली महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. परंतु या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सातबाऱ्यावर असलेल्या खुल्या जागा अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. याबाबत महापालिकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, दोन्ही ग्रामपंचायतींच्या नावे तब्बल ८७ हजार ८४६ चौरस मीटर म्हणजेच ८ लाख ७८ हजार ४६० फूट खुले भूखंड अढळून आल्या आहेत. हे अब्जावधी रुपये किमतीचे खुले भूखंड महापालिकेच्या नावे करण्याची प्रक्रिया सूर असून, यामुळे महापालिका मालामाल होणार आहे.
शहरातील महापालिकेच्या सर्व खुल्या जागा अधिकृतरीत्या नावे लावून घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी पथक तयार केले आहे. या पथकाद्वारे महापालिका लँड बँक तयार करण्यावर भर देत आहे. यात शहरासह सातारा-देवळाई हद्दीतील जागांचाही समावेश आहे. यात सातारा देवळाई ग्रामपंचायत ही फेब्रुवारी २०१६ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आली.
या प्रक्रियेनुसार निवासी, व्यावसायिक आणि शासकीय मालमत्ताही महापालिकेत समाविष्ट होते. यात सातारा देवळाईतील सुमारे २९ हजार मालमत्ता महापालिका हद्दीत आल्या. या सर्व मालमत्तांना महापालिकेने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. महापालिका हद्दीत परिसर येताच येथील व्यापारी संकुल, पेट्रोलपंप, लॉन्स, मंगल कार्यालय, रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, हॉटेलची संख्या झपाट्याने वाढ झाली.
दरम्यान, लवकरच महापालिकेकडून नवीन पाणीपुरवठा योजना, ड्रेनेजलाईन, रस्ते, पथदिवे ही कामे प्रामुख्याने राबविली जात आहेत. झोन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या प्रक्रियेत अद्यापही या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सातबाऱ्यावर असलेल्या शासकीय जमिनी महापालिकेच्या नावे झालेल्या नाहीत. त्यामुळे या जागांची माहिती घेऊन महापालिकेने ही प्रक्रिया सुरू केली आहे. यात सातारा आणि देवाळई या दोन्ही ग्रामपंचायतींच्या नावे ८७ हजार ८४६ चौरस मीटर म्हणजेच ८ लाख ७८ हजार ४६० चौरस फूट एवढी जागा महापालिकेच्या नावावर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सातारामध्येच ६० हजार चौ. मी.
सातारा देवळाईपैकी सर्वाधिक ६० हजार ८६५.२६ चौरस मीटर खूले भूखंड ही एकट्या सातारा परिसरातील विविध गट क्रमांकांमध्ये आहे. तर देवळाईच्या विविध गटांमध्ये सुमारे २६ हजार ९८०.८९ चौरस मीटर खुले भूखंड आहेत. जागा आढळून आल्या आहेत. यातील काही गटांमध्ये मोठे भूखंड ग्रामपंचायतीच्या नावावर आहेत.
बहुतांश जागांवर अतिक्रमण
महापालिकेने नियुक्त केलेल्या पथकाने सातारा-देवळाई ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या जागेचा रेकॉर्ड शोधला, मात्र आता या जागा प्रत्यक्षात शोधण्यात येणार आहे. यातील बहुतांश जागांवर अतिक्रमण झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या जागा महापालिकेला ताब्यात घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे.