वैजापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली असून, पोलीस कर्मचाऱ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव गावात ही धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव नानासाहेब रामजी दिवेकर (रा. बळेगाव, ता. वैजापूर) असे असून ते देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नानासाहेब दिवेकर हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे, मात्र मागील मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे नातेवाईकांसह पोलिस कर्मचाऱ्यांकडून त्यांचा शोध सुरू होता. मात्र कुठे मिळून आले नाही.त्यामुळे त्यांच्या परिवारासह सहकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रविवारी दिवेकर यांच्या मूळ गावी बळेगाव येथे त्यांच्या घरात संशयास्पद गोष्टी आढळून आल्या.
त्यामुळे पोलीस शिऊर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जमिनीत खड्डा खोदून तपास केला असता, त्यामध्ये नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह जमिनीत पुरण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने हा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. खुनामागचे नेमके कारण, आरोपी कोण आणि हा प्रकार कधी व कसा घडला, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.एका पोलीस कर्मचारीच अशा पद्धतीने खून झाल्याने जिल्ह्यात पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे
काही संशयित ताब्यात
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे टीम कडून देखील या घटनेचा कसोशीने तपास सुरू केला असून. घटनास्थळी श्वान पथक देखील तैनात करण्यात आले होते. तर या घटने संदर्भातील काही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.