छत्रपती संभाजीनगर : आकाशवाणी चौकात दुचाकी उभी करून मेडिकलमध्ये औषधी घेण्यासाठी गेलेल्या एकाची मोपेड अवघ्या दहा मिनिटांत चोरट्याने लंपास केली. ही घटना शनिवारी (दि.८) दुपारी ३:२० ते ३:३० या वेळेत घडली.
संदीपान अंकुशराव इंगळे (४९, रा. मिटमिटा) हे मोपेडने (एमएच-२१-बीएल-२४९४) आकाशवाणी चौकातील मेडिकलमध्ये गेले होते. मोपेड बाहेर उभी करून आत गेल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात चोरट्याने हॅन्डल लॉक तोडून मोपेड लंपास केली. विशेष म्हणजे चौकात समोरच वाहतूक पोलिस उभे असतात.
तसेच मोठी वर्दळ असलेल्या चौकात हॅन्डल लॉक तोडून दुचाकी अवघ्या दहा मिनिटांत चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात दुचाकी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, दररोज सरासरी पाच ते सहा दुचाकी शहरातून चोरीला जात आहेत. स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त नावाला उरली आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
सावित्रीनगरातून दुचाकी चोरीला चिकलठाणा भागातील सावित्रीनगर येथून राजू बाळू लांडगे (३६) यांची दुचाकी (एमएच-२०-सीव्ही-१५५६) नोव्हेंबरच्या रात्री चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मजुराची दुचाकी चोरीला
हसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरेवाडी येथून चोरट्याने मनोज शंकर बहादुरे (३०, रा. गल्ली क्र. १) यांची दुचाकी (एमएच-२०-एफसी-८२७५) ही शनिवारी (दि.८) मध्यरात्रीतून लंपास केली. याप्रकरणी हर्सल ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
व्यावसायिकाची दुचाकी लंपास
सेव्हनहिल कॉलनीतून फिर्यादी नरेश धजाराम गुप्ता (६२, प्लॉट क्र. ४२) यांची दुचाकी (एमएच-२०-डीएक्स-८८७८) चोरट्याने गुरुवारी (दि.६) मध्यरात्री लंपास केली. जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.