छत्रपती संभाजीनगर : शहरात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हेगारी, गुंडगिरी, नार्कोटिक्स खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. धुलाईसह धिंड पॅटर्नमुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या शहर पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमध्ये गेल्या दहा महिन्यांत तब्बल १७ गुन्हेगारांना तडीपार, ५ एमपीडीए, तर ३ कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का लावला. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
गुन्हेगारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुकुंदवाडी हद्दीतील सर्वाधिक ८, तर पुंडलिकनगर, सातारा प्रत्येकी ३ आणि जिन्सी, हसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी १ अशा १७ गुन्हेगारांना डीसीपी स्वामी यांनी दोन वर्षांसाठी हद्दपार करून गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवला आहे. सुटकेनंतर पुन्हा गुन्हा नाही, तर थेट जेल ! असा संदेश पोलिसांनी या कारवायांमधून स्पष्टपणे दिला आहे.
कुख्यात ६ गुन्हेगारांवर एमपीडीए
सातारा हद्दीतील अक्षय ऊर्फ भैय्या वाहूळ (२५, रा. एकता कॉलनी, सातारा परिसर) याच्यावर ४ एप्रिल रोजी एमपीडीएची कारवाई न्यायालयाने जेलमधून मुक्त केले. पुंडलिकनगर हद्दीतील रोहित राजू घुले (२१, रा. भारतनगर) याच्यावर २१ मे रोजी एमपीडीएची कारवाई सध्या अमरावती जेलमध्ये आहे. जवाहरनगर हद्दीतील विशाल रमेश कसबे (२२, रा. इंदिरानगर, गारखेडा) याच्यावर ३० मे रोजी एमपीडीएची कारवाई सध्या जेलमध्ये आहे. मुकुंदवाडी हद्दीतील भीमा बबन साळवे (२०, रा. मुकुंदवाडी) याच्यावर ११ जुलै रोजी एमपीडीएची कारवाई सध्या नाशिक जेलमध्ये आहे. एमआयडीसी सिडको ठाण्याच्या हद्दीतील शेख जमीर ऊर्फ कैची शेख सलीम (२६, रा. नारेगाव) याच्यावर २३ ऑगस्टला एमपीडीए सध्या नाशिक जेलमध्ये आहे. तसेच पुंडलिकनगरचा पवन ईश्वरलाल जैस्वाल (२७, रा. शिवाजीनगर) याच्यावर २० सप्टेंबरला एमपीडीएची कारवाईत सध्या जेलमध्ये आहे.
गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरू पोलिस आयुक्तांनी नार्कोटिक्स, गुन्हेगारी मुक्त शहर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार परिमंडळ दोन मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त वाढविण्यात आल्या आहेत. सातत्याने कारवाया सुरू आहेत. गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. नागरिकांची सुरक्षा हेच आमचे पहिले प्राधान्य आहे.प्रशांत स्वामी, डीसीपी, परिमंडळ
टिप्या, मुक्या आणि ठाकूर टोळ्यांवर मोक्का
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कुख्यात गुन्हेगारांचा मुक्काम थेट जेलमध्ये हलविला आहे. यात कुख्यात शेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसूद (३१, रा. विजयनगर) याच्यावर जवाहरनगर हद्दीतील गुन्ह्यात २०२४ मध्ये टोळीतील १६ साथीदारांसह मोक्कामध्ये जेलमध्ये होता. तेथून सुटताच दोन महिन्यांपूर्वी पुन्हा पुंडलिकनगरला लूटमार केल्याने पुन्हा पाच गुन्हेगारांसह टिप्यावर दुसऱ्यांदा मोक्का लावून जेलमध्ये टाकले. मुकुंदवाडीचा कुख्यात मुकेश ऊर्फ मुक्या महेंद्र साळवे (२७, रा. मुकुंदवाडी) यांच्यासह टोळीतील ८ गुन्हेगार तर सातारा येथील कुख्यात अजय रमेश वाहूळ ऊर्फ ठाकूर (२९, रा. सातारा गाव) यांच्यासह टोळीतील ७ आरोपींवर मोक्का लावला असून, जेलमध्ये आहेत.