fraud News : दुबईत आयफोनच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास 12 टक्के परतावा Pudhari file news
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : दुबईत आयफोनच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास 12 टक्के परतावा

आयफोन विक्री व्यवसायाची बतावणी, दुबईतील सासऱ्यासह जावयाविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दुबईत सासऱ्याचा आयफोन आयात-निर्यातीचा व्यवसाय असून, त्यात गुंतवणूक केल्यास ९ ते १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील जावयाने व्यावसायिकांसह त्याच्या दोन मित्रांना ६ कोटी ९ लाख ५७ हजारांचा गंडा घातला. हा प्रकार ३१ मार्च २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या काळात चेलीपुरा, जुना बाजार भागात घडला. शेख रियाज गुलाम रब्बानी (रा. नॅशनल कॉलनी, ह.मु. चेलीपुरा) आणि सय्यद अनिस रझवी (रा. मूळ चेलीपुरा, ह. मु. दुबई) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी सलमान लियाकतखॉ पठाण (३५, रा. वाळूज) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची एसएलपी असोसिएट नावाने जुना बाजारला फर्म आहे. ते रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. पत्नी आयेशाच्या नावे इलेक्ट्रिक वस्तू खरेदी-विक्री, लेबर सप्लाय आदी कामे करतात. २०१५ साली त्यांची आरोपी रियाजसोबत ओळख झाली. त्याने २०२० साली घरी बोलावून पॅन इंडिया इलेक्ट्रिक वस्तू विक्री करत असून, व्यवसायात गुंतवणुकीवर १२ टक्के परतावा देत असल्याचे सांगितले. त्याला सलमान यांनी २५ लाख दिले. त्याने परताव्यासह रक्कम परत करून विश्वास संपादन केला.

त्यानंतर मार्च २०२२ रियाजने सासऱ्याची दुबईत पेपर, सॉफ्टवेअर कंपनी असून, त्यांचा आयफोन आयात निर्यातीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. भारतात मी नवीन सुप्रीम इलेक्ट्रॉनिक्स नावाने फर्म उघडली असून, तू माझ्या व सासऱ्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास पूर्वर्वीपेक्षा अधिक परतावा देईन, असे आमिष दाखविले. पूर्वी परतावा दिल्याने सलमान यांनी त्याला करारनामा करून ९ ते १२ टक्के परतावा रियाजकडून मिळेल, क्रेडिट कार्डमधील १ लाख रक्कम वापरल्यास २५ ते ३५ हजार परतावा, सलमान यांच्या बँक खात्यातून रियाजसोबत व्यवहार करता येईल, असे नमूद केले. एप्रिल २०२२ ते मार्च २०२४ पर्यंत १ कोटी २ लाख सलमान यांनी दिले. रियाजने त्यातून ६३ लाख ८० हजार परत केले.

5 कोटींची जुळवाजुळव

रियाजने सासरा चीन, रशिया, नेपाळ, सौदी, कुवैत या देशांत आयफोन निर्यात करणार असल्याने आपल्याला ५ कोटींची जुळवाजुळव करावी लागणार असल्याचे सांगितले. त्यावर सलमान यांनी २ कोटींपर्यंत करतो, असे सांगितले. दरमहा रियाज काही रक्कम परत करत असल्याने सलमानचा विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनी एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान रियाजला २ कोटी १५ लाख ५० हजार बँक व रोखीने दिले. त्यातील १ कोटी १२ लाख रियाजने परत केले. मुंबईत सासऱ्याचा ३ कोटींचा माल पोलिसांनी पकडल्याचे सांगूनही रक्कम घेतली.

पैसे परत देणे बंद करून टाळाटाळ

रियाजने ऑक्टोबर २०२४ नंतर पैसे परत देणे बंद केले. तो टाळाटाळ करून फोन घेत नव्हता. घरी जाऊन विचारणा केली तेव्हा पैसे करत करणार नसल्याचे सांगून घराबाहेर काढले. सलमान यांची मूळ रक्कम २ कोटी ८१ लाख आणि परताव्याची रक्कम अशी ५ कोटी ७७ लाख ५७हजार, त्यांचा मित्र अक्रम खॉ अकबर खॉ पठाण (रा. वाळूज) याची २० लाख, तर नाजीर इस्माईल शेख याची १२ लाख अशी ६ कोटी ९ लाख ५७ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अधिक तपास उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT