Sillod Illegal Mining Crackdown Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sillod Illegal Mining | सिल्लोडमध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीवर सलग दोन दिवस धडक कारवाई

विनापरवाना ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा

पुढारी वृत्तसेवा

Sillod Illegal Mining Crackdown

सिल्लोड : सिल्लोड शहर आणि परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करत महसूल पथकाने विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केला. यापूर्वी एका हायवा वाहनावरही कारवाई करण्यात आली होती. प्रशासनाच्या या मोहिमेमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

महसूल विभागाचे पथक शहर परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीवर लक्ष ठेवून असताना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एमएच २० एएस ०४२३ क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आला. पथकाने वाहन थांबवून चालकाकडे गौण खनिज वाहतुकीच्या परवान्याची आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली. मात्र, चालकाकडे वैध परवाना, आवश्यक कागदपत्रे आणि रॉयल्टीची पावती नसल्याचे आढळले.

चौकशीदरम्यान चालकाने आपले नाव अशिल सपकाळ, तर वाहनमालकाचे नाव सय्यद वसीम असल्याचे सांगितले. त्यानंतर महसूल पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर आणि दंडात्मक कारवाईसाठी तो तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला.

ही कारवाई तहसीलदार सागर वाघमारे आणि मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अवैध वाहतुकीला थारा नाही!

गौण खनिजांच्या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी काल संध्याकाळी एका हायवा वाहनावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आज ट्रॅक्टर पकडण्यात आल्याने प्रशासनाने अवैध वाहतूकदारांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालुक्यात वाळू, माती किंवा इतर गौण खनिजांची बेकायदेशीर वाहतूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, परवानगी आणि रॉयल्टीशिवाय गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही सातत्याने धडक कारवाई करू
- तहसीलदार सागर वाघमारे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT